Showing posts with label 18may. Show all posts
Showing posts with label 18may. Show all posts

Thursday, 18 May 2023

18 मे - दिनविशेष - जागतिक संग्रहालय दिन

18 मे - दिनविशेष - जागतिक संग्रहालय दिन


संग्रहालयांची संकल्पना, संग्रहित केलेल्या ठेव्याची महिती, नागरिकांना इतिहासातील घडामोडीची व ऐतिहासिक संशोधकांना अभ्यासपर माहिती मिळावी या उद्देशाने इंटरनॅशनल काऊन्सिल ऑफ म्युझियम यांनी १८ मे १९७७ हा दिन जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा करण्यास आरंभ केला. संग्रह म्हटलं की छंद, सामान्य व्यक्ती एखाद्या गोष्टीकडे सीमित दृष्टीकोनातून पाहतो पण त्याच गोष्टीकडे छंदवेडी व्यक्ती कल्पकतेने पाहते. छंद आयुष्यात उर्जा निर्माण करतो, असे मानणाऱ्या आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात कोणतातरी छंद बाळगायला हवा असे म्हणणारे आमचे बंधू दीपक वेलणकर यांचा विंटेज कारचा छंद. ‘विंटेज कार’ बाळगणे हे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. याचा अर्थ ही हौस केवळ श्रीमंत माणसांचीच आहे, असेही नाही. मुख्य म्हणजे त्यासाठी गाडीवर प्रेम असावे लागते. ही गाडी सुद्धा इतर गाडय़ांसारखी धातूपासूनच तयार झालेली असते, असे असले तरी हिचा सांभाळ करताना धसमुसळेपणा करून चालत नाही. तिला तळहातावरील फोडाप्रमाणे जपावे लागते. ती आहे तशीच रहावी यासाठी हरप्रकारे प्रयत्न करावे लागतात. 


एकीकडे अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या कितीही गाड्या बाळगल्या तरी ही गाडी अनमोल असते. इतर गाडय़ांच्या बाबतीत आपण कितीही ‘रफ अँड टफ’ वागत असलो तरी व्हिन्टेज गाडय़ांच्या बाबतीत मात्र ‘हँडल वुइथ केअर’ या धोरणाचा अवलंब करावा लागतो. पुण्यातील दीपक वेलणकर असाच विंटेज व क्लासिक कार व दुचाकीचा छंद बाळगून आहेत. गेली अठरा हून अधिक वर्षे ते विंटेज कार छंद बाळगुन आहेत. दीपक वेलणकर यांच्या कलेक्शन मध्ये १९४२ सालपासून ते १९६२ साला पर्यतच्या विंटेज व क्लासिक गाड्या आहेत. तसेच १९५८ वेस्पा डग्लस ते १९८४ ची एन्फिल्ड मोपा अशा दुचाकी त्यांच्याकडे आहेत. 


त्यांच्या कलेक्शन मध्ये १९३९ सालातील फियाट बलीला (७ सिटर), १९४७ सालची हिंदुस्थान-10, १९४९ सालीची स्कोडा, १९५४ सालची फियाट Milli Cento, १९५८ ची लॅडमास्टर, १९६१ सालची मर्सडीझ 190-D, १९६२ सालची स्टॅन्डर्ड (ओपन) अशा मिळून जवळ जवळ १० ते १२ व्हिन्टेज कार व तेवढ्याच दुचाकी आहेत. दीपक वेलणकर यांच्या मर्सडीझ 190-D ही अक्षय कुमारच्या 'रुस्तम' या चित्रपटात, व फियाट ‘मी वसंतराव’ या चित्रपटात वापरल्या आहेत. त्यांच्या विंटेज कार्स व दुचाकी मेंटेन केल्याने अगदी कालच खरेदी केल्या सारख्या दिसतात. पुणे, मुंबई, गोवा येथे होणाऱ्या 'व्हिंटेज कार' रॅली मध्ये ते नेहमी भाग घेतात. त्यांच्या विंटेज कारचे कायम स्वरूपी एक संग्रहालय करायचा विचार आहे. जागतीक संग्रहालय दिवसाच्या निमित्ताने दीपक वेलणकर यांच्या विंटेज कारच्या छंदाला सलाम.

18 मे दिनविशेष- कोकण कृषी विद्यापीठ स्थापना दिन स्थापना - १८ मे १९७२

18 मे दिनविशेष- कोकण कृषी विद्यापीठ स्थापना दिन

स्थापना - १८ मे १९७२


कोकण कृषी विद्यापीठ म्हणजेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचा आज वर्धापन दिन. कोकणातील शेती, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय यांचा विकास करुन येथील ग्रामीण लोकांची आर्थिक उन्नती करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १८ मे १९७२ रोजी दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केली. त्यावेळी या विद्यापीठाकडे दापोलीचे कृषी महाविद्यालय, मुंबईचे पशुवैद्यक महाविद्यालय आणि कोकणातील १६ संशोधन केंद्रे होती. दोन वर्षांनी कोकणातील तीन शेती शाळाही या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली देण्यात आल्या. या विद्यापीठाचे मुख्य केन्द्र दापोली येथे असून, महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि बृहन्मुंबई हे जिल्हे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात. गेल्या ४८ वर्षात विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्याचा लक्षणीय विस्तार झाला. कोकण कृषी विद्यापीठ हे देशातील सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार प्राप्त केलेले अग्रगण्य कृषी विद्यापीठ आहे. १२ फेब्रुवारी २००१ रोजी कोकणचे सुपुत्र आणि द्रष्टे लोकनेते कै. डॉ. बाळासाहेब सावंत यांचे नाव या विद्यापीठाला दिले गेले.


या विद्यापीठाने अगदी स्थापने पासून कोकणातील शेतकऱ्यांच्या कृषी विषयक गरजांना प्राधान्य देऊन संशोधन केले आणि हे उपयुक्त संशोधन कोकणातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध विस्तार शिक्षण उपक्रम राबविले. त्याचाच परिणाम म्हणून कोकणातील शेतीत क्रांतीकारी परिवर्तन होत आहे. दापोली (रत्नागिरी) येथे कृषी, कृषी अभियांत्रिकी, वनशास्त्र आणि उद्यानविद्या तसेच रोहा (रायगड) येथे काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रम व मुळदे (सिंधुदूर्ग) येथे उद्यान महाविद्यालय अशी सहा घटक महाविद्यालये असून रत्नागिरी येथे मत्स्य महाविद्यालय आहे. याशिवाय विद्यापीठाची मान्यताप्राप्त सहा कृषी व एक उद्यानविद्या महाविद्यालय, दोन कृषी पणन व व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालये, चार अन्नतंत्र महाविद्यालये, चार जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि एक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय कार्यरत आहे. अशाप्रकारे आठ विषयांतील पदवी शिक्षणाची सोय विद्यापीठाने उपलब्ध केली आहे. 


याशिवाय, कृषी विद्याशाखे मध्ये अकरा विषयांत, मत्स्य विद्याशाखेत सहा विषयांत आणि कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेत पाच विषयात पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे कृषी विद्याशाखेत नऊ आणि मत्स्य विद्याशाखेत सहा विषयात पीएचडी शिक्षण दिले जाते. कृषी अभियांत्रिकीच्या तीन विषयात पीएचडी शिक्षणाची सुविधा सुरु आहे. विद्यापीठाच्या निम्नस्तर कृषी विद्याशाखेंतर्गत रायगड जिल्ह्यातील रोहा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे विद्यापीठाची घटक कृषी तंत्र विद्यालये आहेत. शिवाय पालघर जिल्ह्यातील कोसबाडहिल येथील दोन कृषी तंत्र विद्यालये तसेच ३४ खाजगी मान्यताप्राप्त कृषी तंत्र विद्यालये कार्यरत आहेत. 


घटक तंत्र विद्यालया मध्ये दोन वर्ष कालावधीचा कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम तर विना अनुदानित तंत्र विद्यालयामध्ये ३ वर्ष कालावधीचा कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रम शिकविला जातो. तसेच शिरगांव (रत्नागिरी) येथे मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम आहे. याशिवाय बागकाम तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रमही शिकविला जातो. दापोली येथे विद्यापीठाचे मध्यवर्ती ग्रंथालय असून तेथे ४९ हजारहून अधिक ग्रंथ व क्रमिक पुस्तके आहेत. त्याशिवाय, कोकणा विषयी आणि स्पर्धा परीक्षा विषयी स्वतंत्र दालने आहेत. ग्रंथालयात शंभराहून अधिक नियतकालिके व वर्तमानपत्रे येतात. याशिवाय, प्रत्येक महाविद्यालयात स्वतंत्र ग्रंथालय आहे. 


विद्यापीठातील सर्वच महाविद्यालये, ग्रंथालये, वसतीगृहे इत्यादी ठिकाणी संगणक व इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालयातर्फे राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. विविध शिष्यवृत्त्या, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्था मधील प्रवेश प्रक्रिया तसेच रोजगारा संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी पुरेशी निवास व्यवस्था उपलब्ध आहे. संशोधन वाकवली येथील मध्यवर्ती संशोधन केंद्र आणि कोकणात सर्वदूर पसरलेल्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाचे संशोधन कार्य चालते.


कृषी विद्याशाखेतील संशोधन प्रामुख्याने तृणधान्ये, कडधान्ये, गळीतधान्ये, फळपिके, कृषी वनिकी, चारापिके, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय, वनस्पती जैवतंत्रज्ञान, काढणी नंतरचे तंत्रज्ञान, रेशीम शेती, उच्चतंत्र शेती, खार जमीन, कृषी अभियांत्रिकी आणि सामाजिक आर्थिक विषयांवर केंद्रात असते. मत्स्य विद्याशाखेत सागरी, निमखाऱ्या आणि गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन या विषयांवर संशोधन केले जाते व त्यामध्ये मत्स्य उत्पादन व प्रक्रिया, मत्स्य संसाधन व्यवस्थापन आणि मत्स्य जीवशास्त्र इत्यादी विषयांवर भर दिला जातो. कृषी अभियांत्रिकी विद्याशाखे मध्ये मृद व जलसंधारण, सिंचन व निचरा, कृषी संरचना, कृषी प्रक्रिया, कृषी शक्ती आणि यंत्रे, विद्युत व इतर ऊर्जा साधने इत्यादींशी संबंधित अभियांत्रिकी बाबींवर संशोधन केले जाते. 


विविध संस्थांनी पुरस्कृत केलेले सुमारे १३० संशोधन प्रकल्प सध्या विद्यापीठात कार्यान्वित आहेत. विद्यापीठाने आतापर्यंत कोकणातील महत्त्वाच्या पिकांच्या ७५ पेक्षा अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित केल्या आहेत. हापूस आंब्यातील अनियमित फलधारणा आणि फळातील साका हे दोष घालविण्यासाठी रत्ना आणि सिंधु या दोन संकरित जाती विद्यापीठाने विकसित केल्या. विद्यापीठाने सेंट्रल इलेक्ट्रानिक इंजीनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट, चेन्नई आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टीकल्चर रिसर्च, बंगलोर येथील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने हापूस आंबा फळे न कापता त्याचे यंत्राद्वारे स्कॅनिंग करुन आंबा फळातील साका ओळखण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. उच्चतंत्र पुष्पशेतीचा विद्यापीठात सुरु असलेला प्रकल्प आदर्शवत आहे. कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, अळंबी संवर्धन, रेशीमशेती, मधुमक्षिका पालन, गांडूळखत निर्मिती इत्यादी पूरक व्यवसायांचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्याचे तंत्रज्ञान विद्यापीठाने प्रमाणित केले आहे. 


फळमाशीच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या रक्षक सापळ्यास खूप मागणी आहे. मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या दूर करुन मत्स्योत्पादन वाढीस पोषक असे तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मत्स्य विद्याशाखेने विकसित केले आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा संबंधिता पर्यंत प्रसार करण्यासाठी विद्यापीठ अनेक नाविन्यपूर्ण विस्तार शिक्षण उपक्रम राबवित आहे. विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण क्षेत्रात केलेल्या मौलिक योगदानाची दखल घेत, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने देशातील सर्वोत्कृष्ट कृषी विद्यापीठ म्हणून १९९७ साली या विद्यापीठाला गौरविले आहे.

18 मे गणितज्ज्ञ उमर खय्याम जन्मदिन जन्म - १८ मे १०४८ (इराण) स्मृती - ४ डिसेंबर ११३१ (इराण)

18 मे गणितज्ज्ञ उमर खय्याम जन्मदिन
जन्म - १८ मे १०४८ (इराण)
स्मृती - ४ डिसेंबर ११३१ (इराण)


'जन्म आणि मृत्यू' ही माणसाच्या जीवनातील न उलगडणारी कोडी आहेत, असं सांगणारे प्रसिद्ध गणितज्ज्ञ म्हणजे उमर खय्याम. त्यांचा परिचय बहुतेकांना झाडाखाली अरबी वेशातला दाढीवाला कवी, शेजारी सुरा आणि सुंदरी या चित्राद्वारे झालेला असतो. तंबू बांधणीचे काम करणाऱ्या पर्शियातील एका कुटुंबात उमर खय्याम यांचा जन्म  झाला होता. अरबेक सूत्रांनुसार ओमर यांचे पूर्ण नवं हे अबुल फाथ ओमर इब्न इब्राहिम अल खय्याम असे असले तरी आपल्या गणित खगोलशास्त्र व कविता या तिन्ही क्षेत्रा मध्ये ते उमर खय्याम म्हणूनच ओळखले जातात. उमर खय्याम यांनी आपल्या जीवनातील सर्वाधिक काळ हा गणिती शोधांसाठी समर्पित केलं होतं. गणिततज्ञ म्हणून काम करत असताना, क्युबिक समीकरणांचे वर्गीकरण आणि उत्तरे शोधण्यासाठी तयार केलेल्या पद्धतीने त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती. भौमितिक पद्धतीने कोनिक्सचा व छेदबिंदूंचा अभ्यास करून तयार केलेली ही सोप्पी पद्धत आकलनात येऊ शकेल असा पहिला शोध मानला जातो. यासोबतच समांतर विश्वाच्या अस्तित्वा बद्दलचे त्यांचे सिद्धांत देखील वैज्ञानिकांकडून अभ्यासले जातात.


एकीकडे गणिता सारखा विषय हाताळणारे उमर खय्याम हे कवी म्हणून देखील परिचित होते. आपल्या जीवन काळात त्यांनी जवळपास हजारहून देखील जास्त रुबायत व श्लोक तयार केले आहेत. यापैकी 'रुबायत ऑफ ओमर खय्याम' हा एडवर्ड फित्झगेराल्ड याने अनुवाद केलेला कवितांचा संग्रह पश्चिमेकडील देशा मध्ये यांच्या मृत्यू नंतर प्रसिद्ध झाला. तल्लख बुद्धीचे ओमर हे तद्कालीन खोरोसन प्रांतातील मलिक शाह पहिल्या याच्या साम्राज्यात सल्लागार व ज्योतिषी म्हणून काम करत होते. याशिवाय ओमर खय्यम यांनी बीजगणितात देखील मोलाची कामगिरी केल्याचे दिसून येते. आपल्या सांगीतिक व गणित विषयातील शोधांवर आधारित 'प्रॉब्लेम्स ऑफ अरीथमेटिक' हे पुस्तक ओमर यांनी लिहिले आहे. 


उमर खय्याम हे अरब राजवटीतील सर्वोत्कृष्ट गणितज्ज्ञ आणि भविष्यवेत्ता होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रसिद्ध सौरवर्षाचे कॅलेंडर आणि जलाली कॅलेंडरचा शोध लावला. ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करून त्यांनी ज्योतिषशास्त्रातही अनेक शोध लावले होते.  त्यांच्या रुबायांचा भावानुभव ‘श्रीगुरुकरुणामृत’ या नावे प्रसिद्ध झाल्याचे वाचून वाचकांची उत्सुकता निश्चितच चाळवेल. व्यंकटेश माधव दातार यांनी पुस्तकाची जन्मकथा अशी सांगितली आहे की, ‘गुरुमाऊली ब्रह्मानंद मायींनी १९१६ डिसेंबर मध्ये एका उत्सवात उमर खय्यामच्या रुबायांचा मराठीत अनुवाद करून त्यातील तत्त्वज्ञान हे हिंदू तत्त्वज्ञानाशी समान आहे हे स्पष्ट करण्याची आज्ञा दिली. त्यानुसार दातार यांनी हा ग्रंथ रचला. म्हणून त्याचे नाव ‘गुरुकरुणामृत.’ तसेच मराठीत उमर खय्यामच्या ५२४ रुबायांचा अनुवाद माधव ज्युलिअन यांनी केला आहे. ज्युलिअन यांनी रुबायांचे जे वर्गीकरण केले आहे त्यापेक्षा वेगळे वर्गीकरण दातार करतात व त्यातील अर्थाची भिन्न प्रकृती व्यवस्थित मांडतात. उमर खय्याम यांचे ४ डिसेंबर ११३१ रोजी निधन झाले. त्यांना खोरासान येथील खय्याम गार्डन मध्ये पर्शियन विधी प्रमाणे पुरण्यात आले. 

18 मे दिनविशेष - वैज्ञानिक बर्ट्रांड रसेल जन्मदिन जन्म - १८ मे १८७२ (UK) स्मृति - २ फेब्रुवारी १९७० (UK)

18 मे दिनविशेष - वैज्ञानिक बर्ट्रांड रसेल जन्मदिन
जन्म - १८ मे १८७२ (UK)
स्मृति - २ फेब्रुवारी १९७० (UK)


"Thought is subversive and revolutionary, destructive and terrible, Thought is merciless to privilege, established institutions, and comfortable habit. Thought is great and swift and free." ~ बर्ट्रांड रसेल


बर्ट्रांड रसेल हे एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील एक प्रमुख तत्त्वज्ञ, गणिती, इतिहासकार, सामाजिक-राजकीय टीकाकार. या माणसानं पुस्तकं लिहिली, लेख लिहिले, भाषणं दिली, वाद घातले. जन्मभर विचारांचा पाठपुरावा केला. सत्य, विवेक, उदारमतवाद, युद्ध, हट्टाग्रह यांबद्दल रसेलनं गेल्या शतकात लिहून ठेवलेलं आजही तितकंच लागू आहे. वैचारिक स्पष्टता आणि निष्पक्ष चिकित्सा हे रसेल यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य. व्यक्ती कितीही महनीय असली, तरी रसेल तिच्या मोठेपणाचे दडपण घेत नाहीत. तिच्या विचारांना तर्कसंगतीची कसोटी लावून त्यातील काय ग्राह्य आणि काय त्याज्य याची निर्भिड चर्चा ते करतातच. 'अनपॉप्युलर एसेज्' मध्ये रसेल प्लेटो, अ‍ॅरिस्टॉट्ल पासून ते लेबनीझ, कांट, हेगेल, मार्क्स या सर्वांच्या विचारांमधील किंवा वर्तणुकीतील विसंगतीची चर्चा करतात. त्यामागील हेतू अर्थातच त्या व्यक्तीची अप्रतिष्ठा करणे हा नसून, विवेकवादाचा प्रसार हाच असतो. आपल्या समजुती, आपले आचार-विचार सर्वश्रेष्ठ, आपली जात किंवा धर्म सर्वांत योग्य असे मानून ते इतरांवर लादण्याच्या प्रवृत्ती विरुद्ध रसेल जन्मभर लढले. त्यासाठी त्यांनी लेखणी हेच अस्त्र वापरले. 'अनपॉप्युलर एसेज्' हे असेच एक अस्त्र होय. त्यातील लेखांचे विषय वरकरणी निरनिराळे वाटले, तरी त्यांमधील अंतःप्रवाह एकच आहे. तो म्हणजे सत्ताधार्‍यांच्या किंवा बलवानांच्या हट्टाग्रहांपायी समस्त मानवजातीस सहन करावा लागलेला त्रास.


हट्टाग्रहांना दूर कसे ठेवायचे याचेही अनेक साधे-सोपे मार्ग रसेल सुचवतात. त्यातील सर्वांत व्यवहार्य मार्ग म्हणजे विज्ञानाची कार्यपद्धती शिरोधार्य मानणे. विज्ञान कधीही कुठल्याही सिद्धांतास त्रिकालाबाधित सत्य समजून कवटाळून बसत नाही. त्या त्या परिस्थितीतील सर्वांत संभवनीय स्पष्टीकरण याच दृष्टिकोनातून त्यांकडे बघते. नव्या प्रयोगांमधून नवी निरीक्षणे समोर आली, तर आधीचे निष्कर्ष बदलण्याची तयारी ठेवते. विज्ञान वैज्ञानिकांची किंवा प्रचलित समजुतींची सत्ता मानत नाही. म्हणूनच विज्ञान नव्या विचारांचा गळा घोटत नाही. याउलट धर्मशास्त्रांत सत्ता व्यक्तींची किंवा व्यक्तींनी बनवलेल्या नियमांची असते. कालांतराने अशा व्यक्तींचे देव तरी होतात किंवा सत्ताधारी तरी. मग त्यांनी केलेले नियम मोडणे हे पाप तरी समजले जाते, किंवा गुन्हा तरी. 


विज्ञान कोणालाही देव करत नाही, तरी ते नम्र व लवचीक असते. याउलट धर्मशास्त्रे उद्दाम व ताठर होतात. सत्य हा अनेकदा सत्याचा आभास असतो. हा आभास कधी बुद्ध्या तयार केलेला असतो, तर कधी माणसाच्या आकलनशक्तीला पडलेल्या मर्यादांमुळे निर्माण होतो. या मर्यादांचे भान असणे, म्हणजे विवेक. असे भान माणसाला स्वमत-आग्रहांपासून परावृत्त करते; दुसर्‍याला आपल्यापेक्षा निराळे मत असण्याचा अधिकार आहे, हे मान्य करते. हाच झाला उदारमतवाद. आज जगाला या दोन्ही गुणांची नितांत गरज आहे, असे रसेल पोटतिडिकीने १९४० साली सांगत होते, कारण त्या वेळी जगाचा प्रवास पहिल्या महायुद्धा कडून दुसर्‍या महायुद्धाकडे सुरू होता.

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...