Showing posts with label 15may. Show all posts
Showing posts with label 15may. Show all posts

Monday, 15 May 2023

दिनविशेष - 15 मे - शास्त्रज्ञ विल्यामिना फ्लेमिंग जन्मदिन

दिनविशेष - 15 मे - शास्त्रज्ञ विल्यामिना फ्लेमिंग जन्मदिन

जन्म - १५ मे १८५७ (स्कॉटलंड)

स्मृती - २१ मे १९११ (अमेरिका)


विल्यामिना पॅटन स्टीवन्स फ्लेमिंग ही स्कॉटलंड मध्ये जन्मलेली अमेरिकन अंतरिक्ष शास्त्रज्ञ होती. हिने ताऱ्यांना नावे देण्याची प्रमाण पद्धत विकसित करण्यात योगदान दिले व हजारो तारे व इतर अवकाशीय वस्तूंना शास्त्रीय नावे दिली. फ्लेमिंग स्कॉटलंड मध्ये शालेय शिक्षिका होती. २१ वर्षांची असताना ती आपल्या पतीबरोबर बॉस्टनला स्थलांतरित झाली. येथे आल्यावर तिने हार्वर्ड कॉलेज वेधशाळेच्या निदेशक एडवर्ड चार्ल्स पिकरिंग यांच्या घरी मोलकरणीची नोकरी पत्करली. तिच्या शास्त्रीय व व्यावहारिक ज्ञानाने प्रभावित होउन पिकरिंगने फ्लेमिंगला आपल्या वेधशाळेत नोकरी देऊ केली व ताऱ्यांच्या प्रकाशपटलांचा अर्थ लावण्याचे शिकविले. त्या आधारावर फ्लेमिंगने ताऱ्याच्या प्रकाशपटलातील उदजनाच्या प्रमाणावरून शास्त्रीय वर्गीकरण करण्याची पद्धत विकसित केली. याशिवाय तिने १०,००० पेक्षा तारे, ३९ तारकामेघ, ३१० अस्थिर तारे आणि १० नोव्हा बद्दलच्या शास्त्रीय माहितीची नोंद केली. १८८८साली फ्लेमिंगने होर्सहेड तारकामेघ शोधला. सुरुवातीला तिला याचे श्रेय देण्यात आले नव्हते. १९०८ मध्ये फ्लेमिंगची ख्याती झाल्यावर तिले हे श्रेय देण्यात आले.

दिनविशेष - 15 मे - शिक्षणतज्ञ गंगूताई पटवर्धन जन्मदिन

शिक्षणतज्ञ गंगूताई पटवर्धन जन्मदिन

जन्म - १५ मे १९०० (महाड,रायगड)

स्मृती - १ मे १९९८


स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि शिक्षणतज्ञ गंगूताई पटवर्धन यांचा जन्म महाड, रायगड येथे झाला. त्यांच्या बालपणी स्त्रीशिक्षण निषिद्ध होते. परंतु मेहुणे बापूसाहेब चिपळूणकर यांचा त्यांना पाठिंबा लाभला आणि त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. पुढे बापूसाहेब हे महर्षी कर्वे यांच्या हिंगणे येथील भारतीय महिला विद्यापीठात रुजू झाले आणि त्यांच्या पाठोपाठ गंगूबाई पटवर्धनही तेथे दाखल झाल्या. याच संस्थेतील एक विधुर शिक्षक ना.म. पटवर्धन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर लंडन येथे जाऊन मॉण्टेसरीचा अभ्यासक्रम शिकण्याची संधी त्यांनी साधली. याशिवाय अन्य लहान मोठे अभ्यासक्रमही त्यांनी तेथे पूर्ण केले. मायदेशी परतल्यानंतर बडोदे येथील स्त्री अध्यापन पाठ्यशाळेत हेडमिस्ट्रेस पदासाठी त्या निवडल्या गेल्या. भाषेची अडचण नको म्हणून अल्पावधीत त्या गुजराती भाषा शिकल्या. तेथे २५ वर्षे नोकरी केल्यानंतर त्या पुण्यात परतल्या आणि त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी कन्याशाळा नावारूपाला आणली तसेच महर्षी कर्वे यांच्या स्त्री शिक्षण संस्थेत विनावेतन काम केले. या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कार लाभले. मात्र त्यांनी ते समाजालाच परत केले. 

दिनविशेष - 15 मे - क्रांतिकारक सुखदेव थापर जन्मदिन

क्रांतिकारक सुखदेव थापर जन्मदिन

जन्म - १५ मे १९०७ (लुधियाना,पंजाब)

स्मृती - २३ मार्च १९३१


सुखदेव थापर हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचा १९२८ मध्ये जे.पी. सॉण्डर्स यास यमसदनी धाडण्याच्या कटात सहभाग होता. त्यांचा जन्म लुधियाना पंजाब येथे झाला होता. सुखदेव हिंदुस्थान सोशियालिस्ट रिपब्लिक असोसियेशन मधील एक नेता म्हणून त्यांच्या चळवळीत सक्रिय सहभागी होता. त्याने भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी तसेच रशियन राज्यक्रांती व जागतिक क्रांतिकारी साहित्याची छाननी करण्यासाठी लाहोरच्या राष्ट्रीय महाविद्यालयात प्रवेश घेतला असे म्हणतात. भगत सिंग, कॉम्रेड राम चंद्र व भगवती सिंग व्होरा यांच्या बरोबर त्याने लाहोरमध्ये नौजवान भारत सभेची स्थापना केली. तरुणांना स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय करणे, शास्त्रीय विचारपद्धतीचा अवलंब करणे, जातिव्यवस्थेविरुद्ध, अस्पृश्यतेविरुद्ध लढा देणे हे या संघटेनेचे मुख्य उद्दिष्ट होते. सुखवदेववर पं. राम प्रसाद बिस्मील आणि चंद्रशेखर आझाद यांचा प्रभाव होता. सुखदेवने १९२९ मध्ये तुरुंगात कैद्यांना देण्यात येणाऱ्या अमानवीय वागणुकी विरुद्ध तुरुंग उपोषणातही भाग घेतला होता. त्याचे फाशीपूर्वी महात्मा गांधीना सशस्त्र क्रांतिकारी मार्गाचे समर्थन करणारे पत्र, हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दोन मुख्य विचारधारांच्या विचारप्रणालींवर प्रकाश टाकते. त्याच्या कार्यामुळे पंजाब मधील लुधियाना शहारातील त्याच्या शाळेचे नाव अमर झाले. क्रांतिकारक सुखदेव थापर यांना विनम्र अभिवादन !

दिनविशेष 15 मे जागतिक कुटुंब दिन | 15 May World Family Day

दिनविशेष 15 मे जागतिक कुटुंब दिन


१५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्स मध्ये सर्वप्रथम 'जागतिक कुटुंब दिन' साजरा करण्यात आला होता. आजच्या व्हॉट्सअप, फेसबुकच्या जमान्यात विभक्त कुटुंब पद्धतीचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अनेकदा मुलांची त्यातून फरफट होते. मुळातच पाळणा घरापासून आयुष्याची सुरुवात करणाऱ्या मुलांना घरच्या संस्काराची उणीव भासतेच. ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ या संकल्पनेचे अनुकरण केल्याने नवीन पिढीला कौटुंबिक स्वास्थ्य मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आजीच्या हातचे जेवण, आजी आजोबांच्या गोष्टी या सुखाला मुले मुकतात. अशा परिस्थितीत त्यांना कुटुंबाची जाणीव होण्यासाठी दरवर्षी १५ मे रोजी ‘जागतिक कुटुंब दिन’ साजरा केला जातो. भारतीय लोकांनी कुटुंब व्यवस्था जतन केली आहे म्हणून ते समाधानी जीवन जगू शकतात. मूळ अमेरिकन आणि ब्रिटीश लोक मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न असूनही तेवढे समाधानी नाहीत. याचे कारण या समाजाने आपली कुटुंब व्यवस्था टिकवलेली नाही. या लोकांमध्ये घटस्फोट, आई-वडिलांविना कुटुंबे यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आज या देशांत कुटुंब व्यवस्था जतन करण्याचे आवाहन केले जात आहे. जागतिक कुटुंब दिवस पाळण्याची कल्पना त्यातूनच निर्माण झालेली आहे. 


‘छोटं कुटुंब, सुखी कुटुंब’ या घोषणेच्या आजच्या जगात एकत्र कुटुंबांची संख्या कमी झाली आहे. परंतु असं असलं, तरी अलीकडच्या या विभक्त कुटुंब पद्धतीला तडा देत आजी-आजोबा, आई-बाबा, काका-काकू, चुलत भावंडे अशा भल्या मोठया गोतावळ्यासह राहणारी काही ‘मोठी सुखी कुटुंबं’ ही आहेतच. भारतीय कुटुंब पद्धतीबाबत विचार केला असता प्राथमिक व संयुक्त कुटुंब पद्धत एकविवाही व बहुविवाही कुटुंपद्धत, मातृसत्ताक व पितृसत्ताक कुटुंबपद्धत आढळून येते. कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेला माणसांचा समूह. खरतर माणसामधील नाती ही आपल्या जन्मावरून विवाहवरून अथवा एखाद्याला दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. कुटुंब संस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंबसंस्थेत आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात. 


एकत्र कुटुंबसंस्थेत आजी-आजोबा, आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी, काका-काकू त्यांची मुले-मुली असे घटक असतात. साधारण: वडील हा कुटुंबाचा प्रमुख असतो. भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब व्यवस्थेला एक वेगळेच महत्त्व आहे. प्राचीन काळापासून अगदी रामायण महाभारताच्या काळात आपण पाहिले तर, एकत्र कुटुंब व्यवस्थेला एक वेगळेच महत्त्व आहे. आज बायका संसाराला हातभार म्हणून नोकऱ्या करायला लागल्या आहेत. त्यामुळे नवरा बायको दोघे नोकरीसाठी बाहेर असतात. त्यांची मुले शाळेत असली तरी, त्यांना डब्यात पोळी-भाजी ऐवजी कुरकुरे, केक, ड्रायफुड असे काहीतरी दिले जाते. कुटुंब म्हटलं म्हणजे एक माळच आहे. ही माळ प्रेमाच्या धाग्याने गुंफल्या जाते. कुटुंबात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा महत्वाचा घटक असतो. संकटाच्या क्षणी संपूर्ण कुटुंब एकत्र कुटुंब पद्धतीत एकजुटीने संकटाचा सामना करतात. कुटुंब टिकवायचे असेल, तर कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसात प्रेमभाव असणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबाचे ऐक्य नेमहीसाठी टिकून राहील, हा सुखी कुटुंबाचा खरा महामंत्र आहे. आज देशात वाढत असलेल्या विभक्त कुटुंब पद्धतीबाबत आपण विचार करायला हवा. खरतर वृद्धाश्रम आपली भारतीय संस्कृती नाही.


कुटुंबापेक्षा मोठं धन...

कोणतंच नाही !

वडिलांपेक्षा चांगला सल्लागार...

कोणीही नाही !

आईच्या सावलीपेक्षा मोठं जग...

कोणतंच नाही !

भावापेक्षा उत्तम भागिदार...

कोणीही नाही !

बहिणीपेक्षा जवळची शुभचिंतक...

कोणीही नाही !

कुटुंबापेक्षा उत्कृष्ट आपलं...

दुसरं जग व जीवन असूच शकत नाही !

दिनविशेष 15 मे - भारतीय वृक्ष दिन | Special Day 15 May - Indian Tree Day

दिनविशेष - 15 मे - भारतीय वृक्ष दिन

आज जागतिक तापमानात कमालीची वाढ होत आहे. ही परिस्थिती उद्भवण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे, बेसुमार वृक्षतोड. विकासाच्या नावाखाली विविध प्रकल्प राबविण्यासाठी जगभरात मोठ्या संख्येने वृक्षांची कत्तल होत आहे. परिणामी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, प्रदूषणासारख्या संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. अशाच एका रस्ते प्रकल्पाला हैद्राबाद येथील स्थानिकांनी सरकारचा विरोध करत वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेतल्याची घटना २ वर्षांपूर्वी घडली. हैद्राबाद शहरातील कासू ब्रह्मानंद रेड्डी नॅशनल पार्क (केबीआर) परिसरातील हजारो वृक्षतोडीचा सरकारच्या मनसुब्याचा स्थानिकांनी निषेध केला. तेलंगणा सरकारने प्रस्तावित केलेल्या स्ट्रॅटेजिक रोड डेव्हलपमेंट प्लाननुसार केबीआर पार्कचा इको-सेन्सेटीव्ह क्षेत्रासह जवळपास संपूर्ण परिसराला या प्रकल्पामुळे धोका निर्माण झाला होता. यामुळे उद्यानातील जवळपास ६०० पेक्षा अधिक वनस्पती, प्राणी पक्ष्यांच्या शेकडो प्रजातींचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली होती. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी एप्रिल २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात हैद्राबाद रायझिंग या समूहाने एका छोट्याशा निषेध रॅलीचे आयोजन केले होते. 


या समूहात निष्पक्षपाती, अराजकीय लोकांचा समावेश होता. कालांतराने हैद्राबाद शहरातील स्थानिकांनी वृक्ष संवर्धनाच्या उद्देशाने हैद्राबाद रायझिंग समूहाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास सुरुवात केली. मातृदिन, पितृदिन, शिक्षक दिनाप्रमाणेच वृक्ष दिन असावा, अशी कल्पना रायझिंग हैद्राबाद समूहातील सदस्यांना सुचली. त्याप्रमाणे १५ मे २०१६ रोजी हैद्राबाद रायझिंग समूहातर्फे वन दिनाचे आयोजन करण्यात आले. या दिनी वृक्षांना आलिंगण देत, त्यांना पाणी देत, वृक्षांवर पवित्र धाग्यांचे बंधन बांधत सेल्फी घेण्याचा हटके उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात धावपटू, योगा प्रेमी, वृक्ष प्रेमी, निसर्ग प्रेमी, पर्यावरण संरक्षणवादी, शहर नियोजक आणि वाहतूक सल्लागारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 


कार्यक्रमात सहभागी सर्वांनी सरकारच्या वृक्षतोडीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जेव्हा पीटर जे पार्क सारख्या योजनाकारांनी रस्ते रुंदीकरण आणि फ्लायओव्हर्स उभारल्याने वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही, असे सांगितले तरीही प्रस्तावित प्रकल्पासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड का? असा प्रश्न हैद्राबाद रायझिंग समूहातील सदस्यांनी सरकारला विचारला. तसेच सरकारने शाश्वत विकासाचे धोरण अवलंबवावे अशी विनंतीही सदस्यांनी सरकारला यावेळी केली. पर्यावरणाचे प्राध्यापक पुरुषोत्तम रेड्डी यांनीही हैद्राबादकरांच्या या कृतीचे कौतुक केले. तसेच यापुढील काळात १५ मे रोजी भारतातील विविध भागात वृक्ष दिन साजरा होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 


चला तर मग हैद्राबादकरांच्या या स्तुत्य उपक्रमात आपणही सहभागी होऊया. आजच्या दिनी प्रत्येक कुटुंबाने एक तरी वृक्ष लावूया. वृक्ष दिन साजरा करून, पर्यावरण दिन साजरा करूया. तसं महाराष्ट्र सरकारने वृक्ष लागवडीचा प्रचंड मोठा कार्यक्रम गेल्या तीन वर्षांपासून हाती घेतला आहे. कोट्यवधी वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेत लागवडही मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. शासकीय स्तरावरील या मोहिमेला प्रचंड उत्साह असतो. लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे पुढे काय होते, याकडे मात्र सरकरचे आणि सरकारी संस्थांचे लक्ष राहत नाही. त्याकडे अधिक जागरुकतेने लक्ष दिले तर वृक्ष दिनाचं सार्थक झाल्यासारखं होईल.

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...