Showing posts with label व्यक्तिमत्त्व विशेष. Show all posts
Showing posts with label व्यक्तिमत्त्व विशेष. Show all posts

Friday, 19 May 2023

19 मे दिनविशेष - उद्योजक जमशेदजी टाटा स्मृतिदिन

19 मे दिनविशेष - उद्योजक जमशेदजी टाटा स्मृतिदिन
जन्म - ३ मार्च १८३९ (नवसारी,गुजरात)
स्मृती - १९ मे १९०४


टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म नवसारी, गुजरात येथे झाला. ‘टाटा’ हे नाव आज भारतीय उद्योगजगतात कल्पकता, उपक्रमशीलता, सचोटी आणि संपूर्ण व्यावसायिकता यांच्याशी समानधर्मी असे मानले जाते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी टाटा उद्योगसमूहाची भक्कम पायाभरणी करणारे जमशेटजी टाटा यांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस गुजरातच्या नवसारी नावाच्या एका छोट्याशा खेड्यात एक लहानसं रोपटं लावलं. आता या रोपट्याचा वटवृक्ष झालाय, त्याचं नाव टाटा उद्योग समूह. इतक्या वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द असलेला हा देशातला एकमेव उद्योग समूह असावा. जमशेदजींना उद्योगधंद्याची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. अर्थातच घरच्यांचा विरोध पत्करुन स्वत:चं नशीब आजमावायला ते मुंबईत आले तो काळ अत्यंत खडतर होता. कारण नुकताच ब्रिटीश सरकारने १८५७ चा उठाव चिरडला होता. ग्रॅज्युएट झालेल्या जमशेदजींना युरोप, इंग्लंड, अमेरिका येथे जाऊन आल्यावर समजलं की इंग्लंडचं वर्चस्व असलेल्या कापड उद्योगात खरंतर भारतानं मुसंडी मारली तर प्रचंड संधी उपलब्ध होतील. त्यादृष्टीने त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली. सुरुवातीला एकवीस हजार रुपये भांडवल गुंतवून जमशेदजींनी त्यांची पहिली कंपनी स्थापन केली. पुढे काही बंद पडलेल्या तेल गिरण्या, कापड गिरण्या विकत घेऊन, विकून त्यांनी उद्योग वाढवण्यास प्रारंभ केला. 


जमशेदजींना चार क्षेत्रांत स्वतःचा आणि अर्थातच भारताचा ठसा निर्माण करायचा होता - पोलाद कारखाने, अग्रेसर शिक्षणसंस्था, भारतातील सर्वोत्कृष्ट हॉटेल आणि जलविद्युत केंद्र. ज्यापैकी फक्त एक स्वप्न पूर्ण झालेले ते स्वत: पाहू शकले. ते स्वप्न म्हणजे 'द ताजमहल पॅलेस हॉटेल’. त्या काळातील बेचाळीस कोटी रुपये खर्च करुन ३ डिसेंबर १९०३ रोजी उद्घाटन झालेले 'ताजमहल' हे वीज वापरणारे देशातले पहिले हॉटेल होते. बाकी स्वप्न दोराबजी टाटा आणि रतन टाटा या त्यांच्या चिरजीवानी पूर्ण केली. 


आज टाटा गृपच्या १०० कंपन्या जगाच्या सहा खंडांतील ऐंशी देशांत कार्यरत आहेत. त्यातल्या काही मोठ्या कंपन्या म्हणजे टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टाटा ग्लोबल बिव्हरेजेस, टाटा टेलिसर्व्हिसेस, टायटन इंडस्ट्रीज, टाटा कम्युनिकेशन्स आणि ताज हॉटेल्स. एके वर्षी टाटांच्या एका कंपनीत लहान मुलांसाठी एक स्पर्धा ठेवण्यात आली होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण वापरत असलेल्या वस्तूंची नावे लिहायची होती. त्यातली प्रत्येक वस्तू टाटाचे उत्पादन आहे का नाही ते शोधायचे होते. गंभीरपणे विचार केला तर खरोखरच मीठापासून गाडीपर्यंत प्रत्येक वस्तूच्या उत्पादनात टाटाचा हात आहे.

Thursday, 18 May 2023

18 मे दिनविशेष - वैज्ञानिक बर्ट्रांड रसेल जन्मदिन जन्म - १८ मे १८७२ (UK) स्मृति - २ फेब्रुवारी १९७० (UK)

18 मे दिनविशेष - वैज्ञानिक बर्ट्रांड रसेल जन्मदिन
जन्म - १८ मे १८७२ (UK)
स्मृति - २ फेब्रुवारी १९७० (UK)


"Thought is subversive and revolutionary, destructive and terrible, Thought is merciless to privilege, established institutions, and comfortable habit. Thought is great and swift and free." ~ बर्ट्रांड रसेल


बर्ट्रांड रसेल हे एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील एक प्रमुख तत्त्वज्ञ, गणिती, इतिहासकार, सामाजिक-राजकीय टीकाकार. या माणसानं पुस्तकं लिहिली, लेख लिहिले, भाषणं दिली, वाद घातले. जन्मभर विचारांचा पाठपुरावा केला. सत्य, विवेक, उदारमतवाद, युद्ध, हट्टाग्रह यांबद्दल रसेलनं गेल्या शतकात लिहून ठेवलेलं आजही तितकंच लागू आहे. वैचारिक स्पष्टता आणि निष्पक्ष चिकित्सा हे रसेल यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य. व्यक्ती कितीही महनीय असली, तरी रसेल तिच्या मोठेपणाचे दडपण घेत नाहीत. तिच्या विचारांना तर्कसंगतीची कसोटी लावून त्यातील काय ग्राह्य आणि काय त्याज्य याची निर्भिड चर्चा ते करतातच. 'अनपॉप्युलर एसेज्' मध्ये रसेल प्लेटो, अ‍ॅरिस्टॉट्ल पासून ते लेबनीझ, कांट, हेगेल, मार्क्स या सर्वांच्या विचारांमधील किंवा वर्तणुकीतील विसंगतीची चर्चा करतात. त्यामागील हेतू अर्थातच त्या व्यक्तीची अप्रतिष्ठा करणे हा नसून, विवेकवादाचा प्रसार हाच असतो. आपल्या समजुती, आपले आचार-विचार सर्वश्रेष्ठ, आपली जात किंवा धर्म सर्वांत योग्य असे मानून ते इतरांवर लादण्याच्या प्रवृत्ती विरुद्ध रसेल जन्मभर लढले. त्यासाठी त्यांनी लेखणी हेच अस्त्र वापरले. 'अनपॉप्युलर एसेज्' हे असेच एक अस्त्र होय. त्यातील लेखांचे विषय वरकरणी निरनिराळे वाटले, तरी त्यांमधील अंतःप्रवाह एकच आहे. तो म्हणजे सत्ताधार्‍यांच्या किंवा बलवानांच्या हट्टाग्रहांपायी समस्त मानवजातीस सहन करावा लागलेला त्रास.


हट्टाग्रहांना दूर कसे ठेवायचे याचेही अनेक साधे-सोपे मार्ग रसेल सुचवतात. त्यातील सर्वांत व्यवहार्य मार्ग म्हणजे विज्ञानाची कार्यपद्धती शिरोधार्य मानणे. विज्ञान कधीही कुठल्याही सिद्धांतास त्रिकालाबाधित सत्य समजून कवटाळून बसत नाही. त्या त्या परिस्थितीतील सर्वांत संभवनीय स्पष्टीकरण याच दृष्टिकोनातून त्यांकडे बघते. नव्या प्रयोगांमधून नवी निरीक्षणे समोर आली, तर आधीचे निष्कर्ष बदलण्याची तयारी ठेवते. विज्ञान वैज्ञानिकांची किंवा प्रचलित समजुतींची सत्ता मानत नाही. म्हणूनच विज्ञान नव्या विचारांचा गळा घोटत नाही. याउलट धर्मशास्त्रांत सत्ता व्यक्तींची किंवा व्यक्तींनी बनवलेल्या नियमांची असते. कालांतराने अशा व्यक्तींचे देव तरी होतात किंवा सत्ताधारी तरी. मग त्यांनी केलेले नियम मोडणे हे पाप तरी समजले जाते, किंवा गुन्हा तरी. 


विज्ञान कोणालाही देव करत नाही, तरी ते नम्र व लवचीक असते. याउलट धर्मशास्त्रे उद्दाम व ताठर होतात. सत्य हा अनेकदा सत्याचा आभास असतो. हा आभास कधी बुद्ध्या तयार केलेला असतो, तर कधी माणसाच्या आकलनशक्तीला पडलेल्या मर्यादांमुळे निर्माण होतो. या मर्यादांचे भान असणे, म्हणजे विवेक. असे भान माणसाला स्वमत-आग्रहांपासून परावृत्त करते; दुसर्‍याला आपल्यापेक्षा निराळे मत असण्याचा अधिकार आहे, हे मान्य करते. हाच झाला उदारमतवाद. आज जगाला या दोन्ही गुणांची नितांत गरज आहे, असे रसेल पोटतिडिकीने १९४० साली सांगत होते, कारण त्या वेळी जगाचा प्रवास पहिल्या महायुद्धा कडून दुसर्‍या महायुद्धाकडे सुरू होता.

Tuesday, 16 May 2023

दिनविशेष 16 मे - मराठा सेनानी मुरारबाजी देशपांडे स्मृतिदिन | Maratha fighter Murarbaji Deshpande Memorial Day

दिनविशेष 16 मे - मराठा सेनानी मुरारबाजी देशपांडे स्मृतिदिन

स्मृती - १६ मे १६६५ (सातारा)


महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडे यांचे मूळ गाव. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे १६६५ रोजी मोगलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना त्यांस वीरमरण आले. जावळीच्या चंद्रराव मोर्यांशी झडलेल्या संघर्षात शिवाजीराजे भोसले यांना मोर्यांच्या सैन्यातून लढणाऱ्या मुरारबाजी यांच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्य निर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजी देशपांडे यांना मराठा सैन्यात दाखल करून घेतले. स्वराज्यावर औरंगजेबाचे सरदार मिर्झाराजे जयसिंह ह्याच्या रूपात नवीन संकट घोंगावत होते. मिर्झाराजांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते, या नामुष्कीची चाहूल लागताच शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे सोबत बोलणी सुरू केली, पण मिर्झाराजांनी महाराजांना दाद दिली नाही. त्यानंतर मोगल सरदार दिलेरखानाने १६६५ साली घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात मुरारबाजीने गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली. या कठीण परिस्थिती मध्ये देखील मुरारबाजी देशपांडे (महाडकर) यांनी पुरंदर फार शर्तीने लढवला. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मुरारबाजीचा १६ मे १६६५ रोजी या लढाईत अंत झाला.

May 16 - Revolutionary Balkrishna Chafekar Memorial Day | दिनविशेष - १६ मे - क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर स्मृतिदिन

दिनविशेष - १६ मे - क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर स्मृतिदिन

जन्म - १८७३ (पुणे)

स्मृती - १६ मे १८९९


क्रांतीकारक बाळकृष्ण चाफेकर यांचा आज बलीदान दिन. वडील ‍हरिपंत पुणे व मुंबईत हरिकथा सांगायचे. त्यांमुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला. बालवयात तिघेही चाफेकर बंधू हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे. पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरीत होऊन चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणाऱ्या ब्रिटीशा बिरूद्ध टिळकांनी केसरी मधून घणाघाती प्रहार करायला सुरूवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रॅडला भारतात पाचारण केले. रॅडचे प्लेग रोग निवारण करण्याच्या नावाने अत्याचाराचे सत्र सुरु झाले. रॅडने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या साऱ्याचा सूड घेण्याची योजना त्यांनी तायर केली.


त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव यावेळी साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानी चे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ सालच्या मध्यरात्री निवास्थानातून बाहेर पडलेल्या रॅड ह्याचेवर जवळून गोळ्या झाडल्या. रॅड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला.


याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. चाफेकर बंधु निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास फासावर चढवण्यात आले. त्यापाठोबाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले. व चाफेकर बंधूही शहीद झाले. बाळकृष्ण चाफेकर यांना विनम्र अभिवादन !

Monday, 15 May 2023

दिनविशेष - 15 मे - शास्त्रज्ञ विल्यामिना फ्लेमिंग जन्मदिन

दिनविशेष - 15 मे - शास्त्रज्ञ विल्यामिना फ्लेमिंग जन्मदिन

जन्म - १५ मे १८५७ (स्कॉटलंड)

स्मृती - २१ मे १९११ (अमेरिका)


विल्यामिना पॅटन स्टीवन्स फ्लेमिंग ही स्कॉटलंड मध्ये जन्मलेली अमेरिकन अंतरिक्ष शास्त्रज्ञ होती. हिने ताऱ्यांना नावे देण्याची प्रमाण पद्धत विकसित करण्यात योगदान दिले व हजारो तारे व इतर अवकाशीय वस्तूंना शास्त्रीय नावे दिली. फ्लेमिंग स्कॉटलंड मध्ये शालेय शिक्षिका होती. २१ वर्षांची असताना ती आपल्या पतीबरोबर बॉस्टनला स्थलांतरित झाली. येथे आल्यावर तिने हार्वर्ड कॉलेज वेधशाळेच्या निदेशक एडवर्ड चार्ल्स पिकरिंग यांच्या घरी मोलकरणीची नोकरी पत्करली. तिच्या शास्त्रीय व व्यावहारिक ज्ञानाने प्रभावित होउन पिकरिंगने फ्लेमिंगला आपल्या वेधशाळेत नोकरी देऊ केली व ताऱ्यांच्या प्रकाशपटलांचा अर्थ लावण्याचे शिकविले. त्या आधारावर फ्लेमिंगने ताऱ्याच्या प्रकाशपटलातील उदजनाच्या प्रमाणावरून शास्त्रीय वर्गीकरण करण्याची पद्धत विकसित केली. याशिवाय तिने १०,००० पेक्षा तारे, ३९ तारकामेघ, ३१० अस्थिर तारे आणि १० नोव्हा बद्दलच्या शास्त्रीय माहितीची नोंद केली. १८८८साली फ्लेमिंगने होर्सहेड तारकामेघ शोधला. सुरुवातीला तिला याचे श्रेय देण्यात आले नव्हते. १९०८ मध्ये फ्लेमिंगची ख्याती झाल्यावर तिले हे श्रेय देण्यात आले.

दिनविशेष - 15 मे - शिक्षणतज्ञ गंगूताई पटवर्धन जन्मदिन

शिक्षणतज्ञ गंगूताई पटवर्धन जन्मदिन

जन्म - १५ मे १९०० (महाड,रायगड)

स्मृती - १ मे १९९८


स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि शिक्षणतज्ञ गंगूताई पटवर्धन यांचा जन्म महाड, रायगड येथे झाला. त्यांच्या बालपणी स्त्रीशिक्षण निषिद्ध होते. परंतु मेहुणे बापूसाहेब चिपळूणकर यांचा त्यांना पाठिंबा लाभला आणि त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. पुढे बापूसाहेब हे महर्षी कर्वे यांच्या हिंगणे येथील भारतीय महिला विद्यापीठात रुजू झाले आणि त्यांच्या पाठोपाठ गंगूबाई पटवर्धनही तेथे दाखल झाल्या. याच संस्थेतील एक विधुर शिक्षक ना.म. पटवर्धन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर लंडन येथे जाऊन मॉण्टेसरीचा अभ्यासक्रम शिकण्याची संधी त्यांनी साधली. याशिवाय अन्य लहान मोठे अभ्यासक्रमही त्यांनी तेथे पूर्ण केले. मायदेशी परतल्यानंतर बडोदे येथील स्त्री अध्यापन पाठ्यशाळेत हेडमिस्ट्रेस पदासाठी त्या निवडल्या गेल्या. भाषेची अडचण नको म्हणून अल्पावधीत त्या गुजराती भाषा शिकल्या. तेथे २५ वर्षे नोकरी केल्यानंतर त्या पुण्यात परतल्या आणि त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी कन्याशाळा नावारूपाला आणली तसेच महर्षी कर्वे यांच्या स्त्री शिक्षण संस्थेत विनावेतन काम केले. या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कार लाभले. मात्र त्यांनी ते समाजालाच परत केले. 

दिनविशेष - 15 मे - क्रांतिकारक सुखदेव थापर जन्मदिन

क्रांतिकारक सुखदेव थापर जन्मदिन

जन्म - १५ मे १९०७ (लुधियाना,पंजाब)

स्मृती - २३ मार्च १९३१


सुखदेव थापर हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचा १९२८ मध्ये जे.पी. सॉण्डर्स यास यमसदनी धाडण्याच्या कटात सहभाग होता. त्यांचा जन्म लुधियाना पंजाब येथे झाला होता. सुखदेव हिंदुस्थान सोशियालिस्ट रिपब्लिक असोसियेशन मधील एक नेता म्हणून त्यांच्या चळवळीत सक्रिय सहभागी होता. त्याने भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी तसेच रशियन राज्यक्रांती व जागतिक क्रांतिकारी साहित्याची छाननी करण्यासाठी लाहोरच्या राष्ट्रीय महाविद्यालयात प्रवेश घेतला असे म्हणतात. भगत सिंग, कॉम्रेड राम चंद्र व भगवती सिंग व्होरा यांच्या बरोबर त्याने लाहोरमध्ये नौजवान भारत सभेची स्थापना केली. तरुणांना स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय करणे, शास्त्रीय विचारपद्धतीचा अवलंब करणे, जातिव्यवस्थेविरुद्ध, अस्पृश्यतेविरुद्ध लढा देणे हे या संघटेनेचे मुख्य उद्दिष्ट होते. सुखवदेववर पं. राम प्रसाद बिस्मील आणि चंद्रशेखर आझाद यांचा प्रभाव होता. सुखदेवने १९२९ मध्ये तुरुंगात कैद्यांना देण्यात येणाऱ्या अमानवीय वागणुकी विरुद्ध तुरुंग उपोषणातही भाग घेतला होता. त्याचे फाशीपूर्वी महात्मा गांधीना सशस्त्र क्रांतिकारी मार्गाचे समर्थन करणारे पत्र, हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दोन मुख्य विचारधारांच्या विचारप्रणालींवर प्रकाश टाकते. त्याच्या कार्यामुळे पंजाब मधील लुधियाना शहारातील त्याच्या शाळेचे नाव अमर झाले. क्रांतिकारक सुखदेव थापर यांना विनम्र अभिवादन !

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...