Showing posts with label 16may. Show all posts
Showing posts with label 16may. Show all posts

Tuesday, 16 May 2023

दिनविशेष 16 मे - जागतिक कृषी पर्यटन दिवस

दिनविशेष 16 मे - जागतिक कृषी पर्यटन दिवस


आज जागतिक कृषी पर्यटन दिवस. कृषी पर्यटन म्हणजे शाश्वत पर्यटनात अग्रस्थानी आणि पर्यटन रोजगार वाढीस बळकटी देणारा एक पर्यटन प्रकार. एका अर्थाने शहरी जीवनशैलीने ग्रामीण संस्कृतीला मारलेले घट्ट आलिंगन म्हणजेच कृषी पर्यटन असेही आपण म्हणू शकतो. कृषी पर्यटनाला चालना मिळावी म्हणून वर्ष २००९ पासून १६ मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. 'संयुक्त राष्ट्रां'च्या 'जागतिक पर्यटन संघटने'कडून त्याला मान्यता देण्यात आली आहे. अमेरिकेत कृषी पर्यटन हा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. अमेरिकेतील मनुष्यबळाचा ६ टक्के इतका हिस्सा कृषी पर्यटनात रोजगार कमवत असतो. भारतात कृषी पर्यटन सुरु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आज मितीस महाराष्ट्रात ६०० पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्र अस्तित्वात आहेत. कृषी पर्यटन हा व्यवसाय हा अतिशय जोखमीचा व्यवसाय आहे. कारण यात तुमच्या पर्यटकांची जबाबदारी आणि काळजी तुमच्यावर असते. त्यामुळे अनेक गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. कृषी पर्यटनात विशेष घ्यायची काळजी म्हणजे पर्यटकांची सुरक्षितता. पर्यटकांना कधीही असुरक्षित किंवा भीती वाटणे हा धोक्याचा इशारा आहे. 


गावातील आयुष्यातील शांतता, निरागसता आणि निवांत जीवन पद्धती याचा त्यांना पुरेपूर आनंद घेऊ द्या. मात्र कुठेही गावातील गूढ वातावरण, भुतांची भीती, साप, विंचू आणि जंगली प्राणी यांची भीती लोकांना सतावणार नाही याची काळजी घ्या. याच बरोबर गावातील राजकारण, काही कपटी माणसे यांच्या पासून पर्यटकांची काळजी घ्या. एक उत्तम कृषी पर्यटन केंद्र बनवण्यासाठी तुमच्याकडे कौलारू घरं, बैलगाडी, धबधबा किंवा ओहोळ, झरा, तळं, शेत, नदी, विहीर, भरपूर झाडी, गावरान खाद्यपदार्थाची सोय इ. गोष्टी आसपास असणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या पर्यटक संख्येवर तुमचा नफा अवलंबून असतो. 


कृषी पर्यटन हा गावात विशेषत: कोकणात अतिशय यशस्वी होईल असा व्यवसाय आहे. त्यासाठी फक्त चिकाटी आणि आपल्या केंद्राचे उत्तम मार्केटिंग करण्याची हातोटी गरजेची आहे आणि त्यातही सतत कुठल्या प्रकारे आणि कोण कोणत्या पर्यटकांना आपण आकर्षित करू शकतो हे सतत शोधत राहणे गरजेचे आहे. तुम्ही तरुण असाल आणि तुम्हाला चार चौघांपेक्षा वेगळे आणि गावात काही करण्याची इच्छा असेल तर कृषी पर्यटनाचा व्यवसाय तुम्हाला साद घालत आहे. 

दिनविशेष 16 मे - गणितज्ञ विनायक लक्ष्मण छत्रे जन्मदिन | Special Day 16th May - Mathematician Vinayak Laxman Chhatre's birthday

दिनविशेष 16 मे - गणितज्ञ विनायक लक्ष्मण छत्रे जन्मदिन

जन्म - १६ मे १८२५ (नागाव,अलिबाग)

स्मृती - १९ मार्च १८८४


आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य विनायक लक्ष्मण ऊर्फ केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा जन्म अलिबाग तालुक्यातल्या नागाव येथे झाला. १९व्या शतकात जन्म घेऊन आपल्या कर्तबगारीनं कीर्तिमान झालेल्या प्रभावळीत प्राचीन भारतीय तसेच आधुनिक गणित व खगोलशास्त्र यांचे निस्सीम उपासक केरुनाना छत्रे यांचे नाव घेणं भाग आहे. आई वडिलांना बालपणीच अंतरल्यानं त्यांना शिक्षणासाठी मुंबईस चुलत्याकडं यावं लागलं. त्यांच्यामुळंच केरुनानांना वाचनाची गोडी व कोणत्याही प्रश्नाकडं वस्तुनिष्ठ दृष्टीनं पाहण्याची सवय लागली. उत्तरायुष्यात केरुनानांनी गणितात संपादन केलेल्या लौकिकाची चाहूल त्यांच्या विद्यार्थी जीवनातच दिसू लागली होती. विशेषत: गणित, खगोल आणि पदार्थविज्ञाना सारख्या कठीण शास्त्रात त्यांना पुढं जी गती प्राप्त झाली, त्याचे मूळ त्यांना एल्फिन्स्टन इन्स्टिटय़ूट मध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर नि प्रो.आर्लिबार या व्यासंगी गुरूंकडून मिळालेल्या मूलभूत ज्ञानात सापडते. त्याच्या जोरावर केरुनानांनी प्रगल्भ ग्रंथांचे परिशीलन करून या विषयांवर घट्ट पकड बसण्याएवढे त्यातले प्रगत ज्ञान प्राप्त केले. याच्या जोडीला त्यांची असाधारण बुद्धिमत्ता लक्षात घेतली की, पुढे त्यांनी दाखवलेले अध्यापन कौशल्य आणि सरकारदरबारी त्यांना मिळालेल्या मानाच्या जागा यांचे आश्चर्य वाटत नाही. 


मुंबईस कुलाबा दांडीवर अंतरिक्ष चमत्कार व लोहचुंबक यांचे अनुभव घेण्यासाठी १८४० मध्ये प्रो.आर्लिबार यांनी एक वेधशाळा काढली. तिथे केरुनानांची असिस्टंटच्या जागी नेमणूक करण्यात आली. अवघ्या १५ व्या वर्षी द.म. ५० रु. पगारावर मिळालेल्या या नोकरीत नानांनी पुढली १० वर्ष जागरुकपणे हवामानशास्त्राचे प्रशिक्षणच घेतलं, असं म्हणता येईल. पुढील आयुष्यात कोणतंही तत्त्व अथवा संकल्पना सिद्ध होऊन पडताळा आल्याशिवाय ते स्वीकारीत नसत, याचं मूळ या नोकरीत आढळतं. १८५१ पासून मात्र पुणे कॉलेजचे नॉर्मल स्कूल, पुढे ट्रेनिंग कॉलेज आणि अहमदनगरच्या इंग्रजी शाळेचे हेडमास्तर अशा सरकारी संस्थांतून त्यांच्या बदल्या झाल्या. या प्रत्येक ठिकाणी गणित, सृष्टिशास्त्र व पदार्थविज्ञान हेच विषय ते जरुरीप्रमाणे इंग्रजी व मराठीत सराईतपणे शिकवीत असत. दरम्यान, त्यांनी इंजिनीअरिंग कॉलेजातसुद्धा सृष्टिशास्त्रावर व्याख्याने दिली. मात्र १८६५ पासून सेवानिवृत्तीपर्यंत केरुनाना पुण्याच्या डेक्कन कॉलेजात स्थिरपणे होते. 


प्रोफेसर व शेवटी हंगामी प्राचार्य म्हणून जागोजागी जबाबदारीची पदे सांभाळूनसुद्धा आपल्या अध्यापनात कधी त्यांनी हयगय केली नाही की खंड पडू दिला नाही. मुलांना समजेल अशा सोप्या रीतीने शिकविण्याची त्यांची हातोटी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी वाखाणलेली आहे. गणिताशिवाय विद्यार्थ्यांना इतर शास्त्रांचे थोडेबहुत ज्ञान देण्यावर त्यांचा कटाक्ष असे. विद्यार्थ्यांने केव्हाही कुठेही शंका विचारली तरी ते हसत-खेळत हरप्रयत्नाने तिची उकल करीत असत. चिपळूणकर, आगरकर या केरुनानांच्या नामवंत शिष्यांच्या चरित्रात व ते दिवंगत झाल्यावर खुद्द आगरकरांनी लिहिलेल्या मृत्युलेखात त्यांचे विद्याव्यासंग, अध्यापन कौशल्य, स्वभावातील सौजन्य तसेच गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आसरा देणे, प्रसंगी फी-पुस्तकांची त्यांची नड भागवणे, या गुणांचे प्रामुख्याने उल्लेखआलेले आहेत. त्यांनी केलेल्या आर्थिक मदतींचे ठळक उदाहरण म्हणजे, पहिल्या वर्षांच्या परीक्षेची फी भरायला आगरकरांजवळ पैसे नव्हते म्हणून एक नाटक लिहून ते, ती उभी करणार असल्याचं कळल्यावर केरुनानांनी नाटकाचे कागद काढून घेऊन त्यांची फी भरून टाकली. 


मेजर कँडीच्या मराठीतून शाळेय पुस्तकं तयार करण्याच्या उपक्रमात केरुनानांनी सुबोध भाषेत लिहिलेली पुस्तकं लोकप्रिय झाली. अंकगणितात मूलभूत क्रियांबरोबर कर्जव्यवहार, रोखे, सुतार व गवंडी यांच्या कामाची आकारणी इत्यादी व्यावहारिक उदाहरणे घातली आहेत. तर पदार्थविज्ञानात आजूबाजूच्या सृष्टीत घडणारे व्यापार, निसर्ग चमत्कार व पदार्थाचे गुणधर्म यांच्या परिचयाबरोबर प्रयोगासाठी लागणाऱ्या वस्तू व त्यांच्या किमती पुस्तकाच्या परिशिष्टात दिल्या आहेत. कधी कधी या पुस्तकात त्यांनी संवादाचे माध्यमही वापरले आहे. शास्त्रीय ज्ञान स्वभाषेत व्यक्त करण्यासाठी मुंबईत स्थापन झालेल्या, ‘ज्ञान प्रसारक सभे’च्या व्यासपीठावरून केरोपंतांनी हवा, भरतीओहोटी, कालज्ञान, सूर्यावरील डाग आणि पर्जन्यवृष्टी यांचा संबंध असे विविध विषयांवर १७ निबंध वाचले. त्यापैकी भरती-ओहोटीच्या निबंधात, भरती अंतराच्या घनाच्या प्रमाणात कमी होते असे कलनाच्या मदतीने त्यांनी दाखवलं आहे. 


केरुनानांनी लक्ष घातलेला आणखी एक विषय म्हणजे पंचांग शुद्धीकरणाचा. आपल्या सूक्ष्म अभ्यासाने त्यांच्या असं लक्षात आलं की, परंपरागत पंचांगात केलेलं अशुद्ध गणित व घेतलेली ग्रहस्थितींची स्थूलमाने या चुकांमुळं ऋतुकाल तसंच पंचांगात दाखवलेल्या ग्रहस्थितीचा प्रत्यक्षातल्या ग्रहस्थितीशी मेळ बसत नाही. वेधशाळेतील नोकरीमुळे ग्रहांचे वेध घेण्याची कला त्यांना अवगत होती. तेव्हा ही विसंगती दूर करण्यासाठी त्यांनी पंचांग सुधारण्याचे जे प्रयत्न केले त्याच्या तपशिलात न जाता एवढं म्हणणं पुरेसं ठरेल की, केरुनानांनी या कामी बरेच दिवस आपला बहुमोल वेळ खर्च केला. पण त्यांच्या हयातीत हा उद्योग पूर्णत्वास गेला नाही. मात्र लो.टिळकांसारख्या त्यांच्या नामवंत शिष्यानं राजकारणाच्या धकाधकीतही गुरुऋण जाणून व स्वत:स त्यात असलेला रस म्हणूनही ही चळवळ पुढं नेली. 


केरुनानांच्या पुरोगामी विचारसरणीचे द्योतक म्हणजे स्त्रियांच्या सामाजिक सुधारणेस त्यांचा पाठिंबा होता. शिवाय ते मुलींच्या शाळेच्या व्यवस्थापक मंडळावर होते. श्रीमती रमाबाई रानडे यांच्या प्रेरणेने भरणाऱ्या स्त्रियांच्या सभांना हजर राहून त्यांचे शिक्षण करत. स्त्रियांना जड विषयांऐवजी गृहजीवनोपयोगी शिक्षण देण्याच्या मताचे ते होते. मात्र गहन विषयांच्या व्यासंगात गढलेल्या केरुनानांना शास्त्रीय संगीत, संगीत नाटके व स्वत: पियानो वाजवण्याची आवड होती. शिवाय किर्लोस्कर नाटक मंडळीत त्यांचा राबता होता. फार काय नाटकांच्या तालमींना हजर राहून ते मोरोबा वाघोलीकर आणि बाळकोबा नाटेकर या गायक नटांना गाण्याच्या अतिरेकानं नाटकाचा रसभंग होतो, असा सल्ला देत असत. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊन अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपले ‘सौभद्र’ हे नाटक त्यांना अर्पण केलेलं आहे. केरुनाना छत्रे यांच्याविषयी लिहिताना ‘टाइम्स’नं म्हटलं होतं, ‘‘प्रो. छत्रे यांना युरोपात पद्धतशीर शिक्षण मिळालं असतं तर ते एक युगप्रवर्तक शास्त्रज्ञ म्हणून गाजले असते.’’

दिनविशेष 16 मे - मराठा सेनानी मुरारबाजी देशपांडे स्मृतिदिन | Maratha fighter Murarbaji Deshpande Memorial Day

दिनविशेष 16 मे - मराठा सेनानी मुरारबाजी देशपांडे स्मृतिदिन

स्मृती - १६ मे १६६५ (सातारा)


महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडे यांचे मूळ गाव. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे १६६५ रोजी मोगलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना त्यांस वीरमरण आले. जावळीच्या चंद्रराव मोर्यांशी झडलेल्या संघर्षात शिवाजीराजे भोसले यांना मोर्यांच्या सैन्यातून लढणाऱ्या मुरारबाजी यांच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्य निर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजी देशपांडे यांना मराठा सैन्यात दाखल करून घेतले. स्वराज्यावर औरंगजेबाचे सरदार मिर्झाराजे जयसिंह ह्याच्या रूपात नवीन संकट घोंगावत होते. मिर्झाराजांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते, या नामुष्कीची चाहूल लागताच शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे सोबत बोलणी सुरू केली, पण मिर्झाराजांनी महाराजांना दाद दिली नाही. त्यानंतर मोगल सरदार दिलेरखानाने १६६५ साली घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात मुरारबाजीने गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली. या कठीण परिस्थिती मध्ये देखील मुरारबाजी देशपांडे (महाडकर) यांनी पुरंदर फार शर्तीने लढवला. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मुरारबाजीचा १६ मे १६६५ रोजी या लढाईत अंत झाला.

May 16 - Revolutionary Balkrishna Chafekar Memorial Day | दिनविशेष - १६ मे - क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर स्मृतिदिन

दिनविशेष - १६ मे - क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर स्मृतिदिन

जन्म - १८७३ (पुणे)

स्मृती - १६ मे १८९९


क्रांतीकारक बाळकृष्ण चाफेकर यांचा आज बलीदान दिन. वडील ‍हरिपंत पुणे व मुंबईत हरिकथा सांगायचे. त्यांमुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला. बालवयात तिघेही चाफेकर बंधू हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे. पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरीत होऊन चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणाऱ्या ब्रिटीशा बिरूद्ध टिळकांनी केसरी मधून घणाघाती प्रहार करायला सुरूवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रॅडला भारतात पाचारण केले. रॅडचे प्लेग रोग निवारण करण्याच्या नावाने अत्याचाराचे सत्र सुरु झाले. रॅडने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या साऱ्याचा सूड घेण्याची योजना त्यांनी तायर केली.


त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव यावेळी साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानी चे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ सालच्या मध्यरात्री निवास्थानातून बाहेर पडलेल्या रॅड ह्याचेवर जवळून गोळ्या झाडल्या. रॅड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला.


याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. चाफेकर बंधु निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास फासावर चढवण्यात आले. त्यापाठोबाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले. व चाफेकर बंधूही शहीद झाले. बाळकृष्ण चाफेकर यांना विनम्र अभिवादन !

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...