Showing posts with label 12june. Show all posts
Showing posts with label 12june. Show all posts

Tuesday, 6 May 2025

दिनविशेष :- 12 जून - भारत सेवक समाज स्थापना दिन

दिनविशेष :- 12 जून - भारत सेवक समाज स्थापना दिन



संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here

पुण्यातील भारत सेवक समाजाचा (The Servants of Indian Society) आज स्थापना दिन. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या अनेक सेवाभावी, देशभक्त संस्था मध्ये ‘भारत सेवक समाज’ चे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारताच्या सेवेसाठी तरुण, त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने विसाव्या शतकाच्या प्रारंभी म्हणजेच १२ जून १९०५ रोजी गोपाळ कृष्ण गोखले यांनी आपल्या काही जीवनव्रती मित्रांच्या सहकार्याने भारत सेवक समाजाची स्थापना केली. गोखले यांनी स्थापन केलेली ही संस्था संख्यात्मक अंगाने विचार केला तर कधीच खूप मोठी झाली नाही आणि तरीही ती दखलपात्र ठरली. कारण तिच्या सदस्यांनी केलेल्या कार्याची गुणवत्ता. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने याच नावाची दुसरी संस्था पुरस्कृत केल्यामुळे संस्थेने आपले नाव बदलले आणि ‘हिंद सेवक समाज’ असे नवे नाव सरकार दरबारी नोंदवले. जनसामान्यांच्या मनात मात्र ‘भारत सेवक समाज’ या जुन्या नावानेच ही संस्था आपला आब राखून आहे. भारत सेवक समाजाची सुरुवात करण्यापूर्वीचे त्यांचे जीवनही नेमस्त देशकारणाला वाहिलेलेच होते आणि त्या देशकारणाला इंग्रजी अमदानीच्या प्रारंभा पासून महाराष्ट्रात घडलेल्या बहुविध विचारमंथनाची व्यापक पार्श्वभूमी होती. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांच्या संधिकाळात गोखले पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करू लागले. त्यापूर्वी सुमारे दहा वर्षे ते टिळक आगरकर, चिपळूणकर प्रभृतींनी स्थापन केलेल्या ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी ’च्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिकवत होते. सोसायटीचे आजीव सदस्यही झाले होते. अवघ्या पस्तीस रुपयांच्या मासिक वेतनावर ती सेवा पार पाडताना सर्व संबंधितांची आर्थिक कुचंबणा होई. त्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी टिळक, आगरकरा प्रमाणेच गोखल्यांनीही विद्यार्थ्यांना उपयुक्त असे गणिताचे एक पुस्तक लिहिले होते. त्यात वापरलेली सोपी, साधी इंग्रजी भाषा व देशी उदाहरणे यांमुळे ते पुस्तक विलक्षण लोकप्रिय झाले. पुढे तर इंग्लंड मधील मॅक्मिलन कंपनीनेही ते प्रकाशित केले. त्याच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या. नरेन्द्र चपळगावकर यांनी ‘नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज’ या नावाने पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक छोटेखानी असले तरी आशयाच्या दृष्टीने समृद्ध आहे.

दिनविशेष :- 12 जून - भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट जन्मदिन

दिनविशेष :- 12 जून - भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट जन्मदिन

जन्म - १२ जून ४७६ (पाटलीपुत्र, बिहार)

स्मृती - ५५०



संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here


थोर भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म बिहार मधील पाटलीपुत्र येथे झाला. आर्यभट्ट हे भारताचे एक महान गणितज्ञ व भारतीय खगोलशास्त्राचे प्रणेते होते. त्यांनी वयाच्या अवघ्या २१व्या वर्षीच 'आर्यभट्टीय' हा ग्रंथ लिहिला. आर्यभट्ट यांचे बालपण व उर्वरित आयुष्यकाळ पाटलीपुत्र याच नगरीत गेले. खगोलशास्त्रज्ञ म्हणून आर्यभटाचे कर्तृत्व असामान्य आहे. आज उपलब्ध असलेल्या भारतीय खगोलशास्त्रीय ग्रंथांत पहिल्या आर्यभटाच्या 'आर्यभटीय' किंवा 'आर्यसिद्धान्त' या ग्रंथाहून दुसरा प्राचीन ग्रंथ नाही. 'आर्यभटीय' हे नाव त्याला आर्यभटानेच दिले आहे. आर्यभटाचे शिष्य वराहमिहीर, लल्ल वगैरे त्यास 'आर्यसिद्धांत' म्हणून संबोधायचे. 'आर्यभटीय' ग्रंथात 'दशगीतिका' व 'आर्याष्टशत' असे दोन भाग आहेत. हे दोन भाग निरनिराळे ग्रंथ आहेत असे काही तज्ज्ञांचे मत आहे. परंतु हे दोन्ही भाग एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे दोन्ही मिळून एकच सिद्धांत मानणे सयुक्तिक होय. त्याचे चार पाद असून त्यात अवघे एकशे एकवीस श्लोक आहेत. दशगीतिका भागात तेरा श्लोक असून त्यातील तीन प्रार्थनापर आहेत. उर्वरित दहा श्लोकांत ग्रहभगणा संबंधीचे विवेचन आहे (भगण म्हणजे ग्रहांची नक्षत्रमंडळातून एक पूर्ण प्रदक्षिणा). या ग्रंथाचे चार पाद असे- १) गीतिका पाद, २) गणितपाद, ३) कालक्रियापाद, ४) गोलपाद. गीतिकापादात अक्षरांच्या आधारे संक्षेपात संख्या लिहिण्याची स्वनिर्मित पद्धती अवलंबलेली आहे. खगोलशास्त्र किंवा गणित श्लोकबद्ध लिहावयाचे असेल तर ही गोष्ट आवश्यक असते. गणितपादात अंकगणित, बीजगणित, रेखागणित यांचे सूत्ररूप नियम अवघ्या तेहतीस श्लोकात समाविष्ट केलेले आहेत. संख्यालेखन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ याचे विवेचन त्यात असून त्रिभुज, वृत्त व अन्य क्षेत्रे यांचे क्षेत्रफळ, घनफळ, भुज ज्या साधन व त्या संबंधीचा विचार, गणितश्रेणी, वर्गश्रेणी, त्रैराशिक पद्धती, बीजगणित पद्धती, विविध कुट्टके असे अनेक विषय आहेत. कालक्रियापादात कालगणना, युगे, कालविभाजन, ग्रहांची मध्यम व स्पष्ट गती वगैरेंचा समावेश आहे. आर्यभटाने 'आर्यभटीय' ग्रंथाची रचना वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी केली. यावरून त्याच्या कुशल बुद्धिमत्तेची व प्रतिभेची कल्पना येऊ शकेल. आर्यभटीय ग्रंथ संक्षिप्त असला तरी त्याची रचना पद्धती अत्यंत सुसंबद्ध व शास्त्रीय असून त्याची भाषा अत्यंत सुस्पष्ट व अचूक आहे. आर्यभटाचे सिद्धांत प्रत्यक्षात अनुभवास येतात काय? या प्रश्नाचे उत्तर होय असेच द्यावे लागते. दृक्‌प्रत्ययावरून देखील आर्यभटाची योग्यता फार मोठी आहे, हे पटते. आर्यभट नंतरच्या खगोलविदांनी त्यांच्या ग्रंथरचनेतील भाग आपल्या विवेचनासाठी घेतला. अल्बेरुणीने अरबी भाषेत हे ज्ञान या ग्रंथावरूनच नेले. डॉ. केर्न यांनी १८७५ मध्ये हॉलंड देशात लेडेन येथे या सिद्धातावर टीकाग्रंथ लिहिला. भारतात सूर्ययज्वनाने लिहिलेली टीका विशेष प्रसिद्ध आहे. बृहत्संहिता टीकेत उत्पलाने 'आर्यभटीय' ग्रंथातील अवतरणे घेतलेली आहेत.

दिनविशेष :- 12 जून - जागतिक बालकामगार निषेध दिन

दिनविशेष :- 12 जून - जागतिक बालकामगार निषेध दिन



संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here


'बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा' असे आपण नेहमी म्हणतो. कारण बालपणीचा काळ सुखाचा आणि आनंदाचा असतो. ना कसली चिंता ना कसली काळजी. मनसोक्त खेळा, हसा, आनंद लुटा. पण असा हा सुखाचा काळ काही मोजक्याच मुलांच्या नशिबात असतो. कारण जेव्हा आपण घराबाहेर पडून समाजात वावरतो तेव्हा पोटाची खळगी भरण्यासाठी सिग्नलजवळ काही वस्तू विकणारी मुले, हॉटेल, बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर पाणी वाटणारी, टेबल साफ करणारी मुले पाहतो. अशा मुलांना कुठे सुखाचे बालपण अनुभवायला मिळते. कायदा असूनही त्यांचे बालपण हरवत चालले आहे. हेच ते बालकामगार. १२ जून बालकामगार विरोधी दिन त्याविषयी थोडंसं. १४ वर्षा खालील जी मुले स्वत:च्या आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी, रोजगार कमवितात त्यांना बालकामगार म्हणतात. ज्या वयात शाळेत जावून शिकायचे, खेळायचे, बागडायचे त्या वयात हातात झाडू घेऊन साफ-सफाई करायची, भांडी, कपडे धुवायचे, विटा उचलायच्या, दगड फोडायचे अशी अनेक कामे करावी लागतात. एकीकडे बोट ठेवलं ती वस्तू विकत घेऊन देणारी हौशी मॉम-डॅड तर दुसरीकडे कामावर पाठविणारी नाईलाज मायबाप. समाजातील हे चित्र कसे बदलेल आणि कोण बदलणार? हा समाजापुढे गहण प्रश्नच आहे.


१२ जून हा दिवस देशात सर्वत्र बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. बालकामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्यावतीने जिल्हास्तरावर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात २००४ पासून जिल्हधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविल्या जात आहे. या प्रकल्पांतर्गत ९ ते १४ वयोगटातील धोकादायक, व्यवसायामध्ये काम करणाऱ्या बालकामगारांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यात येते. प्रकल्पाचा मुख्य उद्देश बालकामगारांचा त्यांच्या कामापासून परावृत्त करून शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविणे व त्यांच्या पालकांचा आर्थिक स्तर उंचावणे, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे. अमरावती जिल्ह्यात सध्या एकूण ३७ विशेष प्रशिक्षण केंद्र विविध वस्त्यांमध्ये कार्यान्वित आहेत. प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनात साधारत: १५० कर्मचारी काम करीत आहे. या प्रकल्पांतर्गत बालकामगारांना विविध कौशल्य विकास योजनांचा लाभ मिळवून देण्यात येतो. बालकामगारांना अनौपचारिक शिक्षणा बरोबरच त्यांच्यातील कौशल्य व कलागुणांना वाव मिळावा, यासाठी विविध ट्रेडचे व्यवसायपूर्ण प्रशिक्षण देण्यात येते तसेच प्रकल्पाचे कार्य व बालकामगार प्रथेविषयी जनमानसात जनजागृती करण्यात येते.


*बालकामगारांना प्रकल्पांतर्गत मिळणारा लाभ*


प्रत्येक बालकामगाराला दरमहा १५० रुपये विद्यावेतन देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागा मार्फत विद्यार्थी मित्र अभ्यासक्रमाचा विशेष प्रशिक्षण केंद्रात अवलंब करण्यात येतो, शालेय पोषण आहार, पाठ्यपुस्तके आणि आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात. बालकामगारांना त्यांच्या आवडीनुसार तसेच त्यांच्यातील कौशल्यास अनुरूप असे व्यवसाय पूर्ण प्रशिक्षण देण्यात येते, बालकामगारांना विविधांगी उपक्रमातून शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात येते. तसेच जीवन कौशल्य राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पा मार्फत बालकामगारांना जीवन कौशल्य विषयाचा प्रभावी संवाद कौशल्य, स्वत:ची जाणीव, प्रभावी नेतृत्व, निर्णयक्षमता, ध्येय निश्चिती, भावनिक समायोजन, कल्पकता, निरीक्षण निरोगी जीवन यासारख्या विविध विषयांच्या माध्यमातून भावी आयुष्यात सुजाण नागरिक घडविण्याचे प्रयत्न केले जातात. अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात प्रकल्पाचे कामकाज सुयोग्यरित्या सुरू आहे. प्रकल्पाच्या सुरूवाती पासून २०१७ पर्यंत ४ हजारांपेक्षा जास्त बालकामगारांना नियमित शाळेत दाखल करण्यात आले आहे. तसेच प्रकल्पामार्फत बालकामगारांना जन्म दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, संजय गांधी निराधार योजना, सुकन्या योजना, मतदान ओळखपत्र, जीवनदायी योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. यासाठी राज्य शासनाने १९८६ सालापासून बालकामगार विरोधी कायदा बनविला असून या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाल्यास भविष्यात बालकामगार होण्यास आळा बसेल. मुले शिकावी म्हणून अशा अनेक योजना शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत राबविल्या जात आहेत. राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाच्या माध्यमातून बालकामगार होवू नये म्हणून सजगता निर्माण केली जात आहे. त्याला जिल्हास्तरावर भरघोस प्रतिसाद मिळत आहे, हेच या प्रकल्पाचे खरे यश आहे.

दिनविशेष :- 12 जून - खगोलशास्त्रज्ञ मार्गेरिटा हॅक जन्मदिन

दिनविशेष :- 12 जून - खगोलशास्त्रज्ञ मार्गेरिटा हॅक जन्मदिन

जन्म - १२ जून १९२२ (फ्लॉरेन्स,इटली)

स्मृती - २९ जून २०१३



संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here


इटालियन खगोलशास्त्रज्ञ मार्गेरिटा हॅक यांचा जन्म इटली मधील फ्लॉरेन्स येथे झाला. ट्रिस्टे विद्यापीठात मार्गेरिटा हॅक या खगोलाच्या प्रोफेसर म्हणून काम करत होत्या. १९६४ ते १९८७ खगोलशास्त्रीय वेधशाळेचे प्रशासन सांभाळणाऱ्या त्या पहिल्या इटालियन महिला होत्या. मार्गेरिटा यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेचा आणि रिसर्च अ‍ॅक्टिव्हिटीचा व्यासंग फार मोठा होता. ताऱ्यांच्या नेत्रदीपक वैशिष्ट्या बबात त्यांना विशेष रस होता. त्यामध्येच त्यांचे नैपुण्य देखील होते. या बाबतच्या अभ्यासामध्ये ताऱ्यांच्या निर्मिती मधील केमिकल कम्पोझिशन, त्यांच्या पृष्ठभागावरील तापमान आणि ग्रॅव्हिटी यांचा त्यांनी अभ्यास केला होता. १९७० मध्ये त्यांनी कोपर्निकस उपग्रहा मधून युव्ही डाटा वर काम केले होते. त्यांचा पहिला रिसर्च कोपर्निकस वर आधारित डाटा मधून १९७४ मध्ये 'नेचर' या मासिकात मध्ये प्रसिद्ध झाला होता. विज्ञाना सोबतच त्या शिक्षण क्षेत्रा मध्येही कार्यरत होत्या. राजकीय घडामोडींची देखील त्यांना आवड होती. २०१२ मध्ये त्यांच्या ९०व्या वाढदिवसाला त्यांना 'दमा डी ग्रान क्रोस' या इटालियन रिपब्लिकच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या जन्मदिनी गूगलने डूडल बनवले होते. या डूडल मध्ये मार्गेरीटा यांना टेलिस्कोपद्वारे आकाशाकडे पाहताना दाखवले होते.

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...