Thursday 18 May 2023

18 मे दिनविशेष- कोकण कृषी विद्यापीठ स्थापना दिन स्थापना - १८ मे १९७२

18 मे दिनविशेष- कोकण कृषी विद्यापीठ स्थापना दिन

स्थापना - १८ मे १९७२


कोकण कृषी विद्यापीठ म्हणजेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचा आज वर्धापन दिन. कोकणातील शेती, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय यांचा विकास करुन येथील ग्रामीण लोकांची आर्थिक उन्नती करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १८ मे १९७२ रोजी दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केली. त्यावेळी या विद्यापीठाकडे दापोलीचे कृषी महाविद्यालय, मुंबईचे पशुवैद्यक महाविद्यालय आणि कोकणातील १६ संशोधन केंद्रे होती. दोन वर्षांनी कोकणातील तीन शेती शाळाही या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली देण्यात आल्या. या विद्यापीठाचे मुख्य केन्द्र दापोली येथे असून, महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि बृहन्मुंबई हे जिल्हे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात. गेल्या ४८ वर्षात विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्याचा लक्षणीय विस्तार झाला. कोकण कृषी विद्यापीठ हे देशातील सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार प्राप्त केलेले अग्रगण्य कृषी विद्यापीठ आहे. १२ फेब्रुवारी २००१ रोजी कोकणचे सुपुत्र आणि द्रष्टे लोकनेते कै. डॉ. बाळासाहेब सावंत यांचे नाव या विद्यापीठाला दिले गेले.


या विद्यापीठाने अगदी स्थापने पासून कोकणातील शेतकऱ्यांच्या कृषी विषयक गरजांना प्राधान्य देऊन संशोधन केले आणि हे उपयुक्त संशोधन कोकणातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध विस्तार शिक्षण उपक्रम राबविले. त्याचाच परिणाम म्हणून कोकणातील शेतीत क्रांतीकारी परिवर्तन होत आहे. दापोली (रत्नागिरी) येथे कृषी, कृषी अभियांत्रिकी, वनशास्त्र आणि उद्यानविद्या तसेच रोहा (रायगड) येथे काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रम व मुळदे (सिंधुदूर्ग) येथे उद्यान महाविद्यालय अशी सहा घटक महाविद्यालये असून रत्नागिरी येथे मत्स्य महाविद्यालय आहे. याशिवाय विद्यापीठाची मान्यताप्राप्त सहा कृषी व एक उद्यानविद्या महाविद्यालय, दोन कृषी पणन व व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालये, चार अन्नतंत्र महाविद्यालये, चार जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि एक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय कार्यरत आहे. अशाप्रकारे आठ विषयांतील पदवी शिक्षणाची सोय विद्यापीठाने उपलब्ध केली आहे. 


याशिवाय, कृषी विद्याशाखे मध्ये अकरा विषयांत, मत्स्य विद्याशाखेत सहा विषयांत आणि कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेत पाच विषयात पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे कृषी विद्याशाखेत नऊ आणि मत्स्य विद्याशाखेत सहा विषयात पीएचडी शिक्षण दिले जाते. कृषी अभियांत्रिकीच्या तीन विषयात पीएचडी शिक्षणाची सुविधा सुरु आहे. विद्यापीठाच्या निम्नस्तर कृषी विद्याशाखेंतर्गत रायगड जिल्ह्यातील रोहा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे विद्यापीठाची घटक कृषी तंत्र विद्यालये आहेत. शिवाय पालघर जिल्ह्यातील कोसबाडहिल येथील दोन कृषी तंत्र विद्यालये तसेच ३४ खाजगी मान्यताप्राप्त कृषी तंत्र विद्यालये कार्यरत आहेत. 


घटक तंत्र विद्यालया मध्ये दोन वर्ष कालावधीचा कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम तर विना अनुदानित तंत्र विद्यालयामध्ये ३ वर्ष कालावधीचा कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रम शिकविला जातो. तसेच शिरगांव (रत्नागिरी) येथे मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम आहे. याशिवाय बागकाम तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रमही शिकविला जातो. दापोली येथे विद्यापीठाचे मध्यवर्ती ग्रंथालय असून तेथे ४९ हजारहून अधिक ग्रंथ व क्रमिक पुस्तके आहेत. त्याशिवाय, कोकणा विषयी आणि स्पर्धा परीक्षा विषयी स्वतंत्र दालने आहेत. ग्रंथालयात शंभराहून अधिक नियतकालिके व वर्तमानपत्रे येतात. याशिवाय, प्रत्येक महाविद्यालयात स्वतंत्र ग्रंथालय आहे. 


विद्यापीठातील सर्वच महाविद्यालये, ग्रंथालये, वसतीगृहे इत्यादी ठिकाणी संगणक व इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालयातर्फे राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. विविध शिष्यवृत्त्या, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्था मधील प्रवेश प्रक्रिया तसेच रोजगारा संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी पुरेशी निवास व्यवस्था उपलब्ध आहे. संशोधन वाकवली येथील मध्यवर्ती संशोधन केंद्र आणि कोकणात सर्वदूर पसरलेल्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाचे संशोधन कार्य चालते.


कृषी विद्याशाखेतील संशोधन प्रामुख्याने तृणधान्ये, कडधान्ये, गळीतधान्ये, फळपिके, कृषी वनिकी, चारापिके, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय, वनस्पती जैवतंत्रज्ञान, काढणी नंतरचे तंत्रज्ञान, रेशीम शेती, उच्चतंत्र शेती, खार जमीन, कृषी अभियांत्रिकी आणि सामाजिक आर्थिक विषयांवर केंद्रात असते. मत्स्य विद्याशाखेत सागरी, निमखाऱ्या आणि गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन या विषयांवर संशोधन केले जाते व त्यामध्ये मत्स्य उत्पादन व प्रक्रिया, मत्स्य संसाधन व्यवस्थापन आणि मत्स्य जीवशास्त्र इत्यादी विषयांवर भर दिला जातो. कृषी अभियांत्रिकी विद्याशाखे मध्ये मृद व जलसंधारण, सिंचन व निचरा, कृषी संरचना, कृषी प्रक्रिया, कृषी शक्ती आणि यंत्रे, विद्युत व इतर ऊर्जा साधने इत्यादींशी संबंधित अभियांत्रिकी बाबींवर संशोधन केले जाते. 


विविध संस्थांनी पुरस्कृत केलेले सुमारे १३० संशोधन प्रकल्प सध्या विद्यापीठात कार्यान्वित आहेत. विद्यापीठाने आतापर्यंत कोकणातील महत्त्वाच्या पिकांच्या ७५ पेक्षा अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित केल्या आहेत. हापूस आंब्यातील अनियमित फलधारणा आणि फळातील साका हे दोष घालविण्यासाठी रत्ना आणि सिंधु या दोन संकरित जाती विद्यापीठाने विकसित केल्या. विद्यापीठाने सेंट्रल इलेक्ट्रानिक इंजीनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट, चेन्नई आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टीकल्चर रिसर्च, बंगलोर येथील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने हापूस आंबा फळे न कापता त्याचे यंत्राद्वारे स्कॅनिंग करुन आंबा फळातील साका ओळखण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. उच्चतंत्र पुष्पशेतीचा विद्यापीठात सुरु असलेला प्रकल्प आदर्शवत आहे. कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, अळंबी संवर्धन, रेशीमशेती, मधुमक्षिका पालन, गांडूळखत निर्मिती इत्यादी पूरक व्यवसायांचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्याचे तंत्रज्ञान विद्यापीठाने प्रमाणित केले आहे. 


फळमाशीच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या रक्षक सापळ्यास खूप मागणी आहे. मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या दूर करुन मत्स्योत्पादन वाढीस पोषक असे तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मत्स्य विद्याशाखेने विकसित केले आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा संबंधिता पर्यंत प्रसार करण्यासाठी विद्यापीठ अनेक नाविन्यपूर्ण विस्तार शिक्षण उपक्रम राबवित आहे. विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण क्षेत्रात केलेल्या मौलिक योगदानाची दखल घेत, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने देशातील सर्वोत्कृष्ट कृषी विद्यापीठ म्हणून १९९७ साली या विद्यापीठाला गौरविले आहे.

No comments:

Post a Comment

22 January 2024 आजच्या शैक्षणिक बातम्या Today's Educational News शाळा, विद्यार्थी, शिक्षक व शैक्षणिक घडामोडींशी संबंधित दररोजच्या बातम्या.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संबंधित आजच्या शैक्षणिक बातम्या Today's Educational News शाळा, विद्यार्थी, शिक्षक व शैक्षणिक घडामोडींशी संबं...