दिनविशेष :- 03 जून - जागतिक सायकल दिवस
संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here
एप्रिल २०१८ मध्ये युनायटेड नेशन्सच्या जनरल असेम्ब्लीने ३ जून हा 'जागतिक सायकल दिन' साजरा करावा म्हणून घोषित केला. जागतिक आकडेवारी नुसार १९६० च्या दशकात सायकल आणि चारचाकी (कार) यांच्या निर्मितीत फार अंतर नव्हते. सध्या सायकल आणि चारचाकींच्या उत्पादनाचे प्रमाण ३:१ असे आहे.
अमेरिका हा श्रीमंताचा देश असल्यामुळे तिथे सायकल उत्पादनात घट होत असली तरीही युरोपने मात्र सायकलशी आपली मैत्री कायम ठेवली आहे. आशिया खंडात सायकलला जोरदार मागणी आहे. एकट्या चीन मध्ये दरवर्षी चार कोटी सायकल तयार केल्या जातात. जगातील काही देशामध्ये सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. नेदरलँड मध्ये तेथील लोक वाहतुकीचे साधन म्हणून ४० टक्के सायकलचा वापर करतात. यासाठी ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था, वाहतुकीचे नियम, सहज उपलब्धता या सर्व गोष्टींमुळे तिथे सायकल संस्कृती चांगली रुजली आहे. परदेशात कुठल्याही पायाभूत सुविधा उभारताना सायकल स्वारांची सोय लक्षात घेतली जाते. पायाभूत सुविधा उभारताना सर्वप्रथम पादचारी, सायकलस्वार, सार्वजनिक वाहतूक आणि त्यानंतर खासगी वाहने अशा पद्धतीने रस्त्यांची आणि पार्किंगची आखणी केली जाते. नेदरलँड मध्ये २०१४ मध्ये एक अनोखा प्रयोग करण्यात आला. तिथे किलोमीटरभर लांब रात्री चमकणार्या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे. फ्लोरोसंट रंगाचे विशिष्ट तुकडे सिमेंट काँक्रीट मध्ये वापरण्यात आले असून, दिवसाच्या प्रकाशात ते ऊर्जा साठवून घेतात आणि रात्रीच्या अंधारात हाच रस्ता उजळून निघतो. स्पेन मधील सॅन सबॅस्टियन या शहरात २००९ साली जुन्या रेल्वेच्या बोगद्याचे रूपांतर सायकल ट्रॅक मध्ये करण्यात आले असून, हा जगातील सर्वात लांब सायकल बोगदा आहे. विशेष म्हणजे सायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आले आहेत. भारतातही सायकलचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. सायकल हेच दळणवळणाचे प्रमुख साधन होते. भारतातल्या सायकल उद्योगालाही चांगले दिवस आले आहेत. आपल्याकडे दरवर्षी दीड कोटी सायकलचे उत्पादन केले जाते. साध्या सायकलला फारशी मागणी नसली तरीही सुसज्ज आणि अत्याधुनिक सायकलची लोकप्रियता वाढत आहे. भारतातील हिरो, अॅटलस, टीआय सायकल्स अशा नामांकित कंपन्यांनी परदेशी सायकल कंपन्यांशी वितरणाचे करार केले आहेत. गेल्या काही वर्षांत महाविद्यालयीन आणि आयटी आयआयटीतील युवक-युवती आणि चाळिशी गाठलेले मध्यवयीन नागरिक सायकल पर्यटनाच्या प्रेमात पडले आहेत. देशाच्या लेह-लडाख, आसाम-आगरतळा किंवा कुलू-मनाली अशा मनोरम दुर्गम भागांची सायकल रपेट करण्याचा शौक असल्यामुळे सायकल कडे लोकांचा ओढा वाढला आहे. डोंगराळ किंवा खडकाळ भागात प्रवास करण्यासाठी म्हणून विशेष सायकल तयार केली जाते. अशी सायकल निसर्ग आणि देश-प्रदेश डिस्कव्हर (शोध) करण्याची इच्छा पूर्ण करते. सायकल प्रेमींची पथके दरवर्षी मोठ्या उत्साहाने दुर्गम अतिदुर्गम किंवा पहाडी प्रदेशांच्या दौऱ्यास मोठ्या उत्साहाने निघतात. या मंडळींचा सायकल पर्यटनाचा आनंद दिवसागणिक वाढतोच आहे. मात्र, सायकलसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी लागणार्या राजकीय इच्छाशक्तीचा आपल्याकडे अभावच आहे.
No comments:
Post a Comment