Thursday 18 May 2023

18 मे दिनविशेष - वैज्ञानिक बर्ट्रांड रसेल जन्मदिन जन्म - १८ मे १८७२ (UK) स्मृति - २ फेब्रुवारी १९७० (UK)

18 मे दिनविशेष - वैज्ञानिक बर्ट्रांड रसेल जन्मदिन
जन्म - १८ मे १८७२ (UK)
स्मृति - २ फेब्रुवारी १९७० (UK)


"Thought is subversive and revolutionary, destructive and terrible, Thought is merciless to privilege, established institutions, and comfortable habit. Thought is great and swift and free." ~ बर्ट्रांड रसेल


बर्ट्रांड रसेल हे एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील एक प्रमुख तत्त्वज्ञ, गणिती, इतिहासकार, सामाजिक-राजकीय टीकाकार. या माणसानं पुस्तकं लिहिली, लेख लिहिले, भाषणं दिली, वाद घातले. जन्मभर विचारांचा पाठपुरावा केला. सत्य, विवेक, उदारमतवाद, युद्ध, हट्टाग्रह यांबद्दल रसेलनं गेल्या शतकात लिहून ठेवलेलं आजही तितकंच लागू आहे. वैचारिक स्पष्टता आणि निष्पक्ष चिकित्सा हे रसेल यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य. व्यक्ती कितीही महनीय असली, तरी रसेल तिच्या मोठेपणाचे दडपण घेत नाहीत. तिच्या विचारांना तर्कसंगतीची कसोटी लावून त्यातील काय ग्राह्य आणि काय त्याज्य याची निर्भिड चर्चा ते करतातच. 'अनपॉप्युलर एसेज्' मध्ये रसेल प्लेटो, अ‍ॅरिस्टॉट्ल पासून ते लेबनीझ, कांट, हेगेल, मार्क्स या सर्वांच्या विचारांमधील किंवा वर्तणुकीतील विसंगतीची चर्चा करतात. त्यामागील हेतू अर्थातच त्या व्यक्तीची अप्रतिष्ठा करणे हा नसून, विवेकवादाचा प्रसार हाच असतो. आपल्या समजुती, आपले आचार-विचार सर्वश्रेष्ठ, आपली जात किंवा धर्म सर्वांत योग्य असे मानून ते इतरांवर लादण्याच्या प्रवृत्ती विरुद्ध रसेल जन्मभर लढले. त्यासाठी त्यांनी लेखणी हेच अस्त्र वापरले. 'अनपॉप्युलर एसेज्' हे असेच एक अस्त्र होय. त्यातील लेखांचे विषय वरकरणी निरनिराळे वाटले, तरी त्यांमधील अंतःप्रवाह एकच आहे. तो म्हणजे सत्ताधार्‍यांच्या किंवा बलवानांच्या हट्टाग्रहांपायी समस्त मानवजातीस सहन करावा लागलेला त्रास.


हट्टाग्रहांना दूर कसे ठेवायचे याचेही अनेक साधे-सोपे मार्ग रसेल सुचवतात. त्यातील सर्वांत व्यवहार्य मार्ग म्हणजे विज्ञानाची कार्यपद्धती शिरोधार्य मानणे. विज्ञान कधीही कुठल्याही सिद्धांतास त्रिकालाबाधित सत्य समजून कवटाळून बसत नाही. त्या त्या परिस्थितीतील सर्वांत संभवनीय स्पष्टीकरण याच दृष्टिकोनातून त्यांकडे बघते. नव्या प्रयोगांमधून नवी निरीक्षणे समोर आली, तर आधीचे निष्कर्ष बदलण्याची तयारी ठेवते. विज्ञान वैज्ञानिकांची किंवा प्रचलित समजुतींची सत्ता मानत नाही. म्हणूनच विज्ञान नव्या विचारांचा गळा घोटत नाही. याउलट धर्मशास्त्रांत सत्ता व्यक्तींची किंवा व्यक्तींनी बनवलेल्या नियमांची असते. कालांतराने अशा व्यक्तींचे देव तरी होतात किंवा सत्ताधारी तरी. मग त्यांनी केलेले नियम मोडणे हे पाप तरी समजले जाते, किंवा गुन्हा तरी. 


विज्ञान कोणालाही देव करत नाही, तरी ते नम्र व लवचीक असते. याउलट धर्मशास्त्रे उद्दाम व ताठर होतात. सत्य हा अनेकदा सत्याचा आभास असतो. हा आभास कधी बुद्ध्या तयार केलेला असतो, तर कधी माणसाच्या आकलनशक्तीला पडलेल्या मर्यादांमुळे निर्माण होतो. या मर्यादांचे भान असणे, म्हणजे विवेक. असे भान माणसाला स्वमत-आग्रहांपासून परावृत्त करते; दुसर्‍याला आपल्यापेक्षा निराळे मत असण्याचा अधिकार आहे, हे मान्य करते. हाच झाला उदारमतवाद. आज जगाला या दोन्ही गुणांची नितांत गरज आहे, असे रसेल पोटतिडिकीने १९४० साली सांगत होते, कारण त्या वेळी जगाचा प्रवास पहिल्या महायुद्धा कडून दुसर्‍या महायुद्धाकडे सुरू होता.

No comments:

Post a Comment

22 January 2024 आजच्या शैक्षणिक बातम्या Today's Educational News शाळा, विद्यार्थी, शिक्षक व शैक्षणिक घडामोडींशी संबंधित दररोजच्या बातम्या.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संबंधित आजच्या शैक्षणिक बातम्या Today's Educational News शाळा, विद्यार्थी, शिक्षक व शैक्षणिक घडामोडींशी संबं...