Tuesday 16 May 2023

दिनविशेष 16 मे - जागतिक कृषी पर्यटन दिवस

दिनविशेष 16 मे - जागतिक कृषी पर्यटन दिवस


आज जागतिक कृषी पर्यटन दिवस. कृषी पर्यटन म्हणजे शाश्वत पर्यटनात अग्रस्थानी आणि पर्यटन रोजगार वाढीस बळकटी देणारा एक पर्यटन प्रकार. एका अर्थाने शहरी जीवनशैलीने ग्रामीण संस्कृतीला मारलेले घट्ट आलिंगन म्हणजेच कृषी पर्यटन असेही आपण म्हणू शकतो. कृषी पर्यटनाला चालना मिळावी म्हणून वर्ष २००९ पासून १६ मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. 'संयुक्त राष्ट्रां'च्या 'जागतिक पर्यटन संघटने'कडून त्याला मान्यता देण्यात आली आहे. अमेरिकेत कृषी पर्यटन हा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. अमेरिकेतील मनुष्यबळाचा ६ टक्के इतका हिस्सा कृषी पर्यटनात रोजगार कमवत असतो. भारतात कृषी पर्यटन सुरु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आज मितीस महाराष्ट्रात ६०० पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्र अस्तित्वात आहेत. कृषी पर्यटन हा व्यवसाय हा अतिशय जोखमीचा व्यवसाय आहे. कारण यात तुमच्या पर्यटकांची जबाबदारी आणि काळजी तुमच्यावर असते. त्यामुळे अनेक गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. कृषी पर्यटनात विशेष घ्यायची काळजी म्हणजे पर्यटकांची सुरक्षितता. पर्यटकांना कधीही असुरक्षित किंवा भीती वाटणे हा धोक्याचा इशारा आहे. 


गावातील आयुष्यातील शांतता, निरागसता आणि निवांत जीवन पद्धती याचा त्यांना पुरेपूर आनंद घेऊ द्या. मात्र कुठेही गावातील गूढ वातावरण, भुतांची भीती, साप, विंचू आणि जंगली प्राणी यांची भीती लोकांना सतावणार नाही याची काळजी घ्या. याच बरोबर गावातील राजकारण, काही कपटी माणसे यांच्या पासून पर्यटकांची काळजी घ्या. एक उत्तम कृषी पर्यटन केंद्र बनवण्यासाठी तुमच्याकडे कौलारू घरं, बैलगाडी, धबधबा किंवा ओहोळ, झरा, तळं, शेत, नदी, विहीर, भरपूर झाडी, गावरान खाद्यपदार्थाची सोय इ. गोष्टी आसपास असणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या पर्यटक संख्येवर तुमचा नफा अवलंबून असतो. 


कृषी पर्यटन हा गावात विशेषत: कोकणात अतिशय यशस्वी होईल असा व्यवसाय आहे. त्यासाठी फक्त चिकाटी आणि आपल्या केंद्राचे उत्तम मार्केटिंग करण्याची हातोटी गरजेची आहे आणि त्यातही सतत कुठल्या प्रकारे आणि कोण कोणत्या पर्यटकांना आपण आकर्षित करू शकतो हे सतत शोधत राहणे गरजेचे आहे. तुम्ही तरुण असाल आणि तुम्हाला चार चौघांपेक्षा वेगळे आणि गावात काही करण्याची इच्छा असेल तर कृषी पर्यटनाचा व्यवसाय तुम्हाला साद घालत आहे. 

No comments:

Post a Comment

22 January 2024 आजच्या शैक्षणिक बातम्या Today's Educational News शाळा, विद्यार्थी, शिक्षक व शैक्षणिक घडामोडींशी संबंधित दररोजच्या बातम्या.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संबंधित आजच्या शैक्षणिक बातम्या Today's Educational News शाळा, विद्यार्थी, शिक्षक व शैक्षणिक घडामोडींशी संबं...