शिक्षणतज्ञ गंगूताई पटवर्धन जन्मदिन
जन्म - १५ मे १९०० (महाड,रायगड)
स्मृती - १ मे १९९८
स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि शिक्षणतज्ञ गंगूताई पटवर्धन यांचा जन्म महाड, रायगड येथे झाला. त्यांच्या बालपणी स्त्रीशिक्षण निषिद्ध होते. परंतु मेहुणे बापूसाहेब चिपळूणकर यांचा त्यांना पाठिंबा लाभला आणि त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. पुढे बापूसाहेब हे महर्षी कर्वे यांच्या हिंगणे येथील भारतीय महिला विद्यापीठात रुजू झाले आणि त्यांच्या पाठोपाठ गंगूबाई पटवर्धनही तेथे दाखल झाल्या. याच संस्थेतील एक विधुर शिक्षक ना.म. पटवर्धन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर लंडन येथे जाऊन मॉण्टेसरीचा अभ्यासक्रम शिकण्याची संधी त्यांनी साधली. याशिवाय अन्य लहान मोठे अभ्यासक्रमही त्यांनी तेथे पूर्ण केले. मायदेशी परतल्यानंतर बडोदे येथील स्त्री अध्यापन पाठ्यशाळेत हेडमिस्ट्रेस पदासाठी त्या निवडल्या गेल्या. भाषेची अडचण नको म्हणून अल्पावधीत त्या गुजराती भाषा शिकल्या. तेथे २५ वर्षे नोकरी केल्यानंतर त्या पुण्यात परतल्या आणि त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी कन्याशाळा नावारूपाला आणली तसेच महर्षी कर्वे यांच्या स्त्री शिक्षण संस्थेत विनावेतन काम केले. या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कार लाभले. मात्र त्यांनी ते समाजालाच परत केले.
No comments:
Post a Comment