Tuesday, 6 May 2025

दिनविशेष :- 05 जून - कार्यकर्त्या आनंदीबाई धोंडो कर्वे जन्मदिन

दिनविशेष :- 05 जून - कार्यकर्त्या आनंदीबाई धोंडो कर्वे जन्मदिन
जन्म - ५ जून १८६३ 
स्मृती - २९ नोव्हेंबर १९५० (हिंगणे,पुणे)



संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here

१९४४ मध्ये महर्षी कर्वे यांच्या सहधर्मचारिणी आनंदीबाई कर्वे ऊर्फ बाया कर्वे यांचे ‘माझे पुराण’ प्रसिद्ध झाले. बालविधवेचे पूर्वजीवन वाट्याला आलेल्या आणि त्या अनुभवाने पोळल्यामुळे काहीशा रूक्ष, व्यवहारी आणि सकृद्दर्शनी अत्यंत हिशेबी वाटणाऱ्या, पण अंत:करणात दीन-दुबळ्यांविषयी अपरंपार कळवळा असणाऱ्या आनंदीबाई ऊर्फ बाया कर्वे. आधी बालविधवा म्हणून आणि नंतर पुनर्विवाहित म्हणून समाजाची उपेक्षा वाट्याला आली तरी लाचारी न पत्करता, स्वतःच्या मस्तीत, स्वतःच्या मर्जीनुसार जगणाऱ्या आनंदीबाईंच्या जीवनाची ही आगळीवेगळी कहाणी. माहेरची गरिबी आणि अगदी अजाण वयातच आनंदीबाईंना आलेले वैधव्य. वैधव्याचा पुरेसा अर्थही कळत नाही तोच त्यांची सासरी रवानगी झाली. आपल्या स्थितीची खरी जाणीव आनंदीबाईंना झाली ती त्यांना विकेशा व्हावे लागले त्या वेळी. केशवपनाच्या करुण प्रसंगाचा आनंदीबाईंनी कथन केलेला वृत्तान्त कोणत्याही सहृदय वाचकाच्या काळजाला हात घालणारा. त्या म्हणतात, "त्या काळी केस काढून घेण्यास तयार न होणाऱ्या विधवांचे फार हाल होत. त्यांना मार खावा लागे. दोराने बांधीत व इतरही बरेच हाल करीत, ते मला माहीत होते. आपण जर हट्ट केला, तर आपलेही असेच हाल होतील, अशी मला भीती वाटे. हट्ट न धरला तर पुढच्या भयंकर प्रसंगाच्या कल्पनेने अंगावर शहारे येत. झाले. एक दिवस ठरला. मला त्या दिवशी क्षेत्रावर नेण्याचे ठरले. पण क्षेत्रावर जाण्यास मी कबूल नव्हते व ते मी धीर करून स्पष्ट सांगितले. तुम्हाला इथंच काय करायचं ते करा. क्षेत्राबित्रावर मात्र मी येणार नाही." पुढे त्या म्हणतात, "विधवा मुलीची इतकी विटंबना का व्हावी हे मला उमजेना. मी असे काय पाप केले? मी तो सबंध दिवस रडून घालवला. पण उपयोग काय त्याचा. अशा कितीतरी मुली आतापर्यंत माझ्या सारख्या रडल्या असतील, पण त्याचे समाजाला काय?" हा प्रसंग एकदा यायचा असता तर त्याचे दु:ख काही दिवसांनी तरी विसरले असते. पण दर महिन्याला त्याची पुनरावृत्ती होई. आधी विधवा म्हणून आणि नंतर कर्वेशी पुनर्विवाह केला म्हणून लोकांची सतत अवहेलनाच वाट्याला आली, तरी स्वतःतल्या खमकेपणामुळे आनंदीबाई लोकांच्या या टीकेकडे दुर्लक्ष करू शकल्या. प्रथम रमाबाईंच्या प्रोत्साहनाने शारदासदनात आणि नंतर कर्वेच्या प्रोत्साहनामुळे हुजूरपागेत त्यांचे शिक्षण झाले तरी स्वतःच स्वतःला घडविण्याची खरी प्रक्रिया सुरू झाली ती सासुबाईं कडून मिळालेल्या आणि आनंदीबाईंनी कानात साठवून ठेवलेल्या जीवन शिक्षणातूनच. बालपणी दारिद्रय़ाचे चटके सोसून आणि पुढे वैधव्याचे भोग वाट्याला येऊनही नशिबाला दोष देत रडत राहण्या ऐवजी हसत हसत दुर्दैवाला सामोरे जाण्याची एक जीवनशैली आनंदीबाईंनी जोपासली  होती. उतारवयात स्वतःला परावलंबी जिणे जगायला लागू नये म्हणून मुलाकडे आफ्रिकेला गेल्या तरी तिथेही शांत न बसता आश्रमासाठी भाऊबीज फंड उभा करणाऱ्या आनंदीबाईंचे समर्पित असलेले बहुरूपी आयुष्य हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे होते. स्त्री-शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, स्वतंत्र संस्था उभारून त्या संस्थांच्या वाढीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या महर्षी कर्वेचे एक पाऊल सदैव घराबाहेर असे. त्यांच्यासमवेत राहून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन संस्थेसाठी काही करण्याचे भाग्य आनंदीबाईंच्या वात्याला आले. आश्रमासाठी पैसा साठवणे आणि देणग्या गोळा करणे हा एकच ध्यास त्यांनी अखेपर्यंत बाळगला. आयुष्यभर स्वतः काटकसर करून संस्थेसाठी हातात झोळी घेऊन हिंडणाऱ्या आनंदीबाईंचे व्यक्तिमत्त्व आगळेच होते. लोकनिंदेची पर्वा न करता अंतर्मनाचा कौल मानून त्याप्रमाणे आचरण करण्याचे धाडस दाखवणाऱ्या व स्वतंत्र बाण्याच्या आनंदीबाईंचे संपूर्ण जीवन म्हणजे खुले पुस्तक होते. समाजरूढी नि परंपरा बदलून विधवांना निकोप जीवन जगण्याचा हक्क मिळावा म्हणून झटणाऱ्या आनंदीबाई उर्फ बायाबाई कर्वे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

No comments:

Post a Comment

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...