Showing posts with label 01june. Show all posts
Showing posts with label 01june. Show all posts

Tuesday, 6 May 2025

दिनविशेष :- १ जून - राष्ट्रीय वाढदिवस दिन

दिनविशेष :- १ जून - राष्ट्रीय वाढदिवस दिन


संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here



पु.ल. नेहमी म्हणायचे, "जवळ जवळ निम्मा महाराष्ट्र जून मध्येच जन्माला आला आहे आणि तो ही गुरुजींच्या पुण्याई मुळेच" वाढदिवस म्हटलं की लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांनाच हवाहवासा वाटणारा दिवस. जन्माला आल्यापासून आपल्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढीचे आकडेवारीत मोजमाप करणारा दिवस म्हणजेच वाढदिवस. 'सोळावं वरीस धोक्याचं, 'वीस वर्षांचा घोडा झालास तरी कळत नाही का', 'वयाची पन्नाशी गाठली आता रिटायर व्हा’ अशी आपल्याला मिळणारी सारी शाब्दिक आभूषणे आपल्याला वाढत्या वयाची जाणीव करून देत असतात. अर्थात प्रत्येकाचा वाढदिवस वेगवेगळ्या तारखेला साजरा होत असतो. काही वेळेला आपल्या फ्रेंड सर्कल मधल्या दोघं तिघांची, चार पाच जणांची जन्म तारीख एकच असू शकते, नव्हे ती असतेच. पण १ जून हा असा दिवस आहे की, चाळीस पन्नास वयाच्या घरात असलेल्या थोडे थोडके नाही तर किमान ५० ते १०० जणांचे वाढदिवस १ जूनलाच असतात. असं काय आहे की, १ जून हा दिवस चाळीशी पन्नाशी उलटलेल्या प्रत्येकाचाच वाढदिवस असतो. १ जूनचे वाढदिवसाचे गणित, संख्याशास्त्राला चक्रावून टाकणारे. सदर काळातील जनगणना हा तर मोठा विनोद ठरावा. एकाच दिवशी एक नव्हे तर अनेक गावांमधील अनेक बालके १ जूनला जन्माला यावी, यासारखे प्रशासकीय सत्य त्या काळातील ‘आदर्श’ प्रकरणाचं उत्तर शोधलं असता एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली.


साधारण चाळीस पन्नास किंवा त्यापूर्वी खेड्यापाड्या मध्ये सुरक्षित प्रसूतीची सोय नव्हती. सर्व काही अनुभवी सुईणीच्या हातात असायचं. शिक्षण सुद्धा कमी असल्याने जन्मलेल्या बाळाची जन्म वेळ तर सोडाच पण जन्मतारीख सुद्धा काही लोकांना माहित नसायची. मग ज्यावेळी शाळेत प्रवेश घ्यायची वेळ यायची, तेव्हा मुलाच्या पालकाना अचूक तारीख सांगता यायची नाही. त्यामुळे जन्मतारीख कोणती असा प्रश्न विचारला तर, तारखेच्या नजीकचा एखादी घटना, एखादा सण असे ठोकताळे सांगितले जायचे. पण गुरुजींना एझ्याट तारीख हवी असल्याने, पण ती काही पालकांना सांगता यायची नाही. मग काय शाळा सुरु होण्याच्या आठ दहा दिवस आधीची तारीख गुरुजीच मुलाच्या नावापुढे लिहायचे, ती शाळा प्रवेशाची तारीख म्हणजेच १ जून आणि त्यापूर्वी ५-६ वर्ष हे जन्म वर्ष म्हणून लिहिलं जाऊ लागलं आणि बऱ्याच जणांना १ जून ही जन्मतारीख चिकटली. अगदी एका घरातल्याच सर्व भावडांची जन्मतारीख ही १ जून असल्याचं दिसून येतं. अर्थात गेल्या तीस चाळीस वर्षात परिस्थतीत खूप बदल झाला आहे. जन्माच्या नोंदी सरकारी दप्तरी होऊ लागल्या आहेत. पण चाळीस पन्नास वर्षांपूर्वी १ जून हीच सर्वांसाठी जन्मतारीख होती. त्यामुळेच आज बरेच जण आपला वाढदिवस साजरा करताहेत. राष्ट्रीय वाढदिवस दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

दिनविशेष :- १ जून - डेक्कन क्वीन चा वाढदिवस

दिनविशेष :- १ जून - डेक्कन क्वीन चा वाढदिवस


संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here



दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीनचा आज वाढदिवस. १ जून १९३० साली ती सुरुवातीला केवळ शनिवारी धावणारी गाडी होती. ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी ती सुरू झाली होती. अगदी सुरुवातीला ती कल्याण ते पुणे या मार्गावर धावत होती. मात्र आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनस हे स्टेशन बांधून झाल्यानंतर ही गाडी पुढे तिथ पर्यंत वाढविण्यात आली आणि आठवड्याची गाडी दररोज करण्यात आली. सकाळी तीन तास प्रवास करून आपल्या कामाच्या ठिकाणी जाऊन पुन्हा संध्याकाळी पुण्यात परत येता येते म्हणून पुणेकरांनी तिचा आश्रय घेतला. तिच्यात पहिल्यांदा विशेष प्रवाशांसाठी पहिल्या वर्गाचा डबा होता, मात्र नंतरच्या काळात डब्याच्या रचनेत, रंगात व सोयी मध्ये अनेक बदल केले गेले आणि दख्खनची राणी वाढत्या वयाबरोबरच नटत गेली. सुरुवातीच्या काळात या गाडी विषयी फारच आकर्षण होते. दख्खनची राणी, निसर्गरम्य घाटातून होणारा तिचा प्रवास, त्याच बरोबर बोगद्यातून तिचे जाणे याचे सारे कौतुक करण्यात आलेले होते. दख्खनच्या राणीच्या प्रवाशांना सुद्धा तिचे फार कौतुक असते आणि दरवर्षी हे प्रवासी हिचा वाढदिवस साजरा करतात. दख्खनच्या राणी ही भारतातली अशी एकमेव जुनी गाडी आहे की, जिला कधीही कोळशाचे इंजिन लावले गेलेले नाही. ती शक्यतो विजेवरच धावते, पण कधी अडचण आलीच तर तिला डिझेल इंजिन जोडले गेलेले आहे. दख्खनकजी राणी पहिली सुपरफास्ट रेल्वे आहे. मुंबई ते पुणे दरम्यानचे अंतर सव्वा तीन तासात कापले जाते ही कल्पना सुद्धा पूर्वी केली जात नव्हती. आजही डेक्कन क्वीन आपली लोकप्रियता टिकवून आहे. लिम्का बुक मध्ये नोंद असलेली आणि आयएसओ प्रमाणपत्र मिळालेल्या डेक्कन क्वीनची ‘डायिनग कार’ डिसेंबर २०१४ ला काढण्यात आली होती. प्रवाशांची मागणी आणि हर्षां शहा यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १ जून २०१५ रोजी गाडीच्या ८६ व्या वाढदिवशी ‘डायनिंग कार’ पुन्हा जोडण्यात आली. डेक्कन क्वीन सोबतच पंजाब मेल चाही आज वाढदिवस आहे. पंजाब मेल १ जून १९१२ या वर्षी सुरू झाली होती.

दिनविशेष :- १ जून - साहित्यिक सत्येंद्रनाथ टागोर जन्मदिन

दिनविशेष :- १ जून - साहित्यिक सत्येंद्रनाथ टागोर जन्मदिन

जन्म - १ जून १८४२ (कोलकाता)

स्मृती - ९ जानेवारी १९२३ (कोलकाता)


संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here


एक उच्चपदस्थ बंगाली अधिकारी व साहित्यिक. कलकत्ता येथे प्रख्यात टागोर (ठाकूर) घराण्यात जन्म. महर्षी देवेंद्रनाथांचे द्वितीय पुत्र व रवींद्रनाथांचे बंधू. महर्षी देवेंद्रनाथांच्या ऋषितुल्य चारित्र्याचा व ब्राह्मो समाजाच्या चळवळीचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण खाजगी रीत्या घरीच झाले. नंतर कलकत्त्याच्या हिंदू स्कूल मधून ते प्रवेश परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात शिक्षण घेतले. १८६२ मध्ये ICS परीक्षेसाठी ते इंग्लंडला गेले आणि १८६३ मध्ये ते ICS झाले. १८६४ मध्ये त्यांची मुंबई इलाख्यात सरकारी नोकरीत नेमणूक झाली. भारतातील ते पहिले ICS व उच्चपदस्थ सरकारी नोकर होत. मुंबईस त्यांची नेमणूक झाल्यामुळे, बंगाल व महाराष्ट्राचे नाते अधिक जवळचे होण्याला साहाय्य झाले. विलायतेला जाण्यापूर्वी रवींद्रनाथ पाच-सहा महिने सत्येंद्रनाथ यांच्याकडे मुंबईस व अहमदाबाद येथे राहिले होते. सरकारी नोकरीतून १८९७ मध्ये निवृत्त झाल्यावर ते कलकत्त्यास स्थायिक झाले. सत्येंद्रनाथांचा बौद्धधर्म (१९०१) हा ग्रंथ बंगाली साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याशिवाय बोम्बाई चित्र, आमार बाल्यकथा ओ बोम्बाई प्रवास हे आत्मचरित्र, सुशीला, वीरसिंह ही नाटके त्याच प्रमाणे कालिदासाच्या मेघदूताचा त्यांनी केलेला बंगाली अनुवाद, नवरत्नमाला इ. ग्रंथ उल्लेखनीय होत. विशेष म्हणजे सत्येंद्रनाथांना मराठी उत्तम येत होते व त्यांनी लो. टिळकांच्या गीतारहस्याचा बंगालीत अनुवादही केला. सत्येंद्रनाथ पुरोगामी विचारांचे सुधारक व स्त्रीस्वातंत्र्याचे कैवारी होते. त्यांनी त्यांच्या पत्नी ज्ञानदानंदिनी देवींना पुढाकार घ्यावयास लावून स्त्रीमुक्ती आंदोलनास हातभार लावला. ज्ञानदानंदिनी देवींनी आपल्या कुटुंबातील पडदापद्धती झुगारून दिली व रूढी विरुद्ध बंड पुकारले. राजभवनात व्हाइसरॉयकडून सत्कार होणाऱ्‍या त्या आद्य भारतीय महिला होत. सत्येंद्रनाथांचे स्त्री स्वाधीनता हे पुस्तक उद्‌बोधक व विचार प्रवर्तक ठरले. स्वदेशा विषयी व मातृभाषे विषयी सत्येंद्रनाथांना नितांत प्रेम होते. त्या वेळी बंगाल मध्ये राष्ट्रीय गीत म्हणून गाजलेले ‘मिले राबे भारत संतान’ हे गीत सत्येंद्रनाथांनी लिहिले होते. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.

दिनविशेष :- १ जून - पहिल्या एसटी बस ची सुरुवात

दिनविशेष :- १ जून - पहिल्या एसटी बस ची सुरुवात


संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here



पहिली एसटी बस १ जून १९४८ रोजी पुणे-नगर मार्गावर धावली. BSRTC ची (बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन) पहिली बस यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. लाकडी बॉडी आणि आजूबाजूला कापडी कव्हर लावलेली ती बस होती. त्यावेळी देखील अवैध वाहतूक होती, त्यांच्याकडून एसटीवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने पोलिस बंदोबस्तात माळीवाडा ते पुणे अशी बस नेता आली, अशी माहिती एसटीचे पहिले वाहक श्री लक्ष्मण केवटे यांनी दिली. हीच त्या काळातील राज्य परिवहन म्हणजे आजच्या एसटीची सुरुवात होती. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही BSRTC मध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) या नावाने महामंडळाचा कारभार सुरु राहिला.


एसटीचे पहिले चालक लक्ष्मण केवटे

केवटे म्हणाले, जून १९४८ रोजी सकाळी आठ वाजता तीस आसनक्षमता असलेली बेडफोर्ड कंपनीची पहिली बस पुण्याकडे रवाना झाली. या मार्गाचे प्रवासी भाडे केवळ अडीच रुपये होते. या प्रवासात चास, सुपा, शिरुर, लोणीकंद या प्रत्येक ठिकाणी बसला थांबवून लोक प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करत होते. शिवाजीनगरला कार्पोरेशनजवळ बसचा शेवटचा थांबा होता. त्यावेळी अवैध वाहतूक होती, पण राज्य परिवहनची सेवा सुरू झाल्यानंतर खासगी वाहतुकीचा धंदा बसेल, या भीतीपोटी बसवर हल्ला होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही बस माळीवाडा वेशीपासून ते पुणे पर्यंत पोलिस बंदोबस्तात नेण्यात आली. त्यावेळी किसन राऊत हे बसचे चालक होते, असे केवटे यांनी सांगितले. पहिली बस रस्त्यावर धावत असल्याने नागरिकांमध्ये उत्साह होता. ठिकठिकाणी बसचे स्वागत करण्यात येत होते. सुवासिनींनी देखील नगर ते पुणे या मार्गावर विविध ठिकाणी एसटीचे पूजन केले. तो दिवस आजही माझ्या स्मरणात आहे, असेही केवटे यांनी सांगितले. आज श्री केवटे यांचे वय ९० हुन जास्त आहे.


लाल डबा हे लोकांचं तसं आवडीचं नाव. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर कुठेही जायचं असेल तर मुंबईत प्रायव्हेट बसगाडय़ांची काही कमतरता नाही. तरीही सुरक्षेच्या दृष्टीने ‘गडया, अपुला लाल डबाच बरा!’ असं म्हणत मुंबईकर एसटीलाच प्राधान्य देतो. अशा या महामंडळाचे मुंबईत मोठी तीन आगारं आहेत. एक म्हणजे मुंबई सेंट्रल, दुसरा परेल आणि तिसरा कुर्ला आगार. कुर्ला आगार बाकीच्या दोन आगारांच्या तुलनेत मोठा असला तरीही ज्या ठिकाणी डेपो असलेलं मोठं आगार म्हणजे मुंबई सेंट्रलचं आगार होय. असा हा मुंबई सेंट्रलचा डेपो सगळ्यात जुना आणि पहिल्या क्रमांकाचा डेपो म्हणूनच ओळखला जातो.पश्चिम रेल्वे स्थानकाच्या समोरच असलेला राज्य परिवहन मंडळाचा हा मुंबई सेंट्रलचा डेपो म्हणजे मुख्यालय आहे. या डेपोची स्थापना १९५० साली झाली. मुंबई सेंट्रलचा भाग हा मध्यवर्ती असल्याने तिथेच मोठी जागा घेतली आणि या सगळ्या बसेस एकाच छताखाली आल्या. हळूहळू बसेसची संख्या वाढू लागली आणि इथला लोड वाढला. त्यामुळे नंतर परेल (६०च्या दरम्यान) आणि कुर्ला डेपोची निर्मिती झाली.


साडेपंधरा हजार बसेसचा ताफा, दररोज १७ हजार मार्गांवर ७० हजार प्रवाशांना सेवा, अगदी खेड्यापाड्यांपासून ते महानगरांपर्यंत सुमारे एक हजार थांबे, २४७ आगारे आणि वर्षाकाठी फायदा झालाच तर जेमतेम पाच कोटी रूपयांचा महाराष्ट्रातील विशेषत: ग्रामीण भागातील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या राज्य परिवहन मंहामंडळाची म्हणजेच सर्वसाधारण भाषेतील ‘एसटी‘ ची ही बोलकी आकडेवारी आहे. महाराष्ट्रातील ८० टक्के जनता अद्यापही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर म्हणजेच एसटीवर अवलंबून आहेत. व्यवहारात लोक जिला 'लाल डबा’ असे संबोधतात ती एसटी ची बस राज्याच्या अगदी दुर्गम भागातील वाड्यावस्त्यांपासून ते थेट नगरे महानगरां पर्यंत पोहोचते. एसटीचे हे भक्कम आणि विस्तीर्ण जाळेच लाल डब्याच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे. शासकीय म्हणून भरवशाची सेवा, माफक दर आणि विनम्र कर्मचारी ही सुद्धा एसटीची वैशिष्टे म्हटली पाहिजेत. एसटीच्या स्थापनेच्या दिवसापासून आजतागायत एसटीच्या ज्या समस्या आहेत त्या कायम आहेत. 'एसटी'ला ना स्वायतता, ना ही कुठल्या प्रकारच्या सवलती, उलट एसटी विविध सवलती प्रवासांना देते आहे. महामंडळ अनेक सामाजिक बंधने पाळून प्रवाशांकरता सोई पुरवते, भाड्यामध्ये सवलत देते. स्पर्धेत बाजी मारण्यासाठी संपूर्ण राज्यभर असलेले विस्तीर्ण जाळे ही एसटीची महत्त्वपूर्ण जमेची बाब आहे. 'गाव तेथे रस्ता अन रस्ता तेथे एसटी' हे ब्रीद वाक्य महामंडळाने ९९% खरे केले आहे. सर्व खासगी प्रवासी कंपन्यांनी एकत्र येऊन ठरवले तरी त्यांना एवढ्या खेड्यापाड्यांपर्यंत बससेवा सुरू करता येणार नाही.


एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणे आताशा काही प्रमाणात कमी प्रतीचे मानले जावू लागले. शहरी भागातल्या प्रवाशांमध्ये तर एसटी महामंडळाबद्दल उणे बोलणे म्हणजे फॅशन झाल्यासारखे वाटते. एसटीवर टीका करताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, जे मार्ग फायद्याचे नाहीत त्या मार्गावरही नुकसान सोसून एसटीची गाडी धावते आहे. ज्या खासगी वाहतूकदारांची तरफदारी लोक करीत आहेत, ते खासगी वाहतूकवाले मग ते ‘नीता असेल, गीता असेल, कोंडुस्कर असतील’ हे खासगी वाहतूकदार जेवढे फायद्याचे मार्ग, त्या फायद्याच्या मार्गावरच त्यांच्या गाडय़ा चालवतात. या खासगी वाहतूकदारांना एसटी सारखी स्टँण्डसाठी गुंतवणूक करावी लागत नाही. त्यांचे थांबे नाहीत. आपल्या बापाच्या मालकीचा रस्ता आहे, असे समजून या खासगी गाडय़ा रस्त्यावरच उभ्या असतात, तिथेच प्रवासी भरतात. एसटी मध्ये एक लाख कामगार आहेत. १० मध्यवर्ती गॅरेज आहेत. तिथल्या कामगारांना नेहमी पगार आहे, युनिफॉर्म आहे, कामगार क्षेत्रातला बोनस आहे, हक्काच्या रजा आहेत. एसटी मध्ये स्वातंत्र्य सैनिकांना मोफत प्रवास आहे, विद्यार्थ्यांना सवलती आहेत. सामाजिक बांधिलकीची सर्वात मोठी जाण महाराष्ट्रातल्या एसटीनेच ठेवलेली आहे. यापैकी कसलीही जबाबदारी खासगी वाहतूकदार घेत नाहीत. त्यांच्या तिकिटांचे दर त्यांना हवे तेव्हा वाढवतात. त्यावर कोणताही निर्बंध नाही, परिवहन खात्याला ते जुमानत नाहीत.


महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाचे प्रवासाचे सर्वात त्यामानाने स्वस्त आणि सोयीचे वाहतुकीचे साधन म्हणून खेडय़ा-पाडय़ात एसटी हेच सगळय़ात मोठे साधन आहे. कित्येक दुर्गम ठिकाणी एसटी तोटा सहन करून चालवली जाते ती फक्त प्रवाशांच्या प्रवास सुविधेकरीता. केवळ सामाजिक दृष्टीनेच महामंडळ याकडे पाहत आलेले आहे. सरकार काही वेळा कर सवलत अन इतर नियमांमध्ये महामंडळालाही सुट देत नाही. या एसटीच्या डेपोचं वैशिष्टय़ म्हणजे जो कधीही झोपलेला किंवा शांत आढळणार नाही. सतत वर्दळ असते. म्हणजे या ठिकाणी २४ तास एसटी बसेसची ये-जा सुरू असते. कधी रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी गावी जाण्यासाठी डेपोला गेलात तर तुम्हाला जवळपास दोनशे गाडया या डेपो मध्ये विश्रांती घेत उभ्या दिसतील. हे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची आगारे म्हणजे चोवीस तास चाकरमान्यांची अविरत सेवा सुरू असते. कधीतरी एसटीची ही दिवस अन् रात्रीची धावपळ पाहायला एखादा तरी या आगारांत फेरफटका मारायला हवा.

दिनविशेष - 01 जून - जागतिक पालक दिन

दिनविशेष :- 01 जून - जागतिक पालक दिन


संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here



जागतिक पालक दिन हा १ जून २०१२ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने १७ सप्टेंबर २०१२ रोजी हा संकल्प केला. जगभरातील पालकांचे प्रेम, वचनबद्धता आणि निस्वार्थ प्रयत्नांना त्यांच्या मुलांकडे सन्मानित करण्यासाठी आणि मान्य करण्यासाठी हा दिवस घोषित करण्यात आला.


पालक नव्हे, मित्र बना !


मुलं डोळ्या देखत केव्हा मोठी होतात, हे पालकांना कळतच नाही. बोट धरून नाजूक पाऊल पुढे टाकून चालणं शिकणारी मुले पालकांची उंची गाठतात आणि त्यांची म्हातारपणाची काठी होत असतात. मुलांना 'मोठ्ठ' करण्यासाठी पालक विविध भूमिकांमधून झिजत असतात. वयाची टप्पे ओलांडणार्‍या मुलांशी सुसंगत संवाद साधताना पालकांना कसरत करावी लागत असते. पालक नव्हे तर मित्र म्हणून त्यांना वयात आलेल्या मुलांशी सुसंवाद साधावा लागत असतो. परंतु, काही कुटुंबातील पालक मुलांशी सुसंगती साधण्‍यात अपयशी ठरत असतात. 'मित्र' म्हणून भूमिका त्यांना वठवता येत नाही. आपली मुले कितीही मोठी झाली तरी ती लहानच आहे, असे त्यांना वाटते. 'गप्प बस, तुला काय कळतं त्यातलं?' असे म्हणून कळत्या वयात मुलांना सारखं ऐकवत असतात.


मुलांनी धोक्याचं वय ओलांडलं अर्थात वयाचं १६ वर्ष पूर्ण केल्यानंतर पालकांनी 'पालक' म्हणून नव्हे तर एक 'मित्र' म्हणून मुलांशी सुसंवाद साधणं आवश्यक झाले आहे. किशोरावस्थेत पदार्पण करणारी मुले लहरी असतात. या स्थितीत त्यांच्या इच्छेनुसार घ्यावं लागत असतं. त्याच्या मनाविरूध्द एखादी गोष्‍ट झाल्यास ते हिरमुसतात. वेळ प्रसंगी केव्हा काय करतील याचा भरवसा नसतो. अलिकडच्या काळात मानसोपचारतज्ज्ञाकडे येणार्‍या पाककांची संख्येत कमालीची वाढ झाली आहे. पालकांविषयी नव्हे तर पाल्यांच्याच समस्या अधिक आहेत. तारूण्यात प्रवेश कणार्‍या मुलांमुलीमध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात. या वयात मुलांना पुरुषत्वाची तर मुलींना स्त्रित्वाची जाणीव होत असते. याच अवस्थेतून पालकही गेलेले असतात. परंतु आपल्या मुलांना ते समजून घेत नाहीत


तारूण्याच्या उंबरवठ्यावर पाऊल ठेवणार्‍या मुलांमध्ये अमुलाग्र बदल होत असतात. त्याच्यात असे काही बदल होतात की, त्याने त्यांचे पालक थक्क होत असतात. मुलांना बालपणी न आवडणार्‍या गोष्ट त्यांना किशोरावस्थेत आवडत असतात. मुले-मुलींशी तर मुली-मुलांशी मैत्री करतात. मुले अधिक वेळ घराबाहेर घालवतात. पालकांच्या सांगण्‍याकडे त्यांचे मुळीच लक्ष नसते. पालकांनी मुलीला 'तो मुलगा कोण?', या पालकांच्या प्रश्नाला 'तो माझा चांगला मित्र आहे आणि बाकी काही नाही.' असे साचेबद्ध ठरलेलं उत्तर मुली देत असतात. या स्थितीत पालकांनी आणखी काही सुनावले म्हणजे ती आणखी बिथरते. कॉलेजातून घरी यायला मुद्दाम उशीर, चौकशीअंती समजतं, ते प्रेमप्रकरण. तर, मुलांच्या बाबतीतही 'सेम टू सेन' अस्संच. परंतु थोडं वेगळं, म्हणजे लपून सिगारेटी‍ फुंकणं, अभ्यासाच्या वेळी मित्रासोबत रिकामं भटकणं वैगेरे वैगेरे. अशा परिस्थितीत काय करावं? त्यांच्याशी कसं वागावं? असे यक्ष प्रश्न पालकांसमोर उभे ठाकतात. आपल्याच मुलांना समजावण्यासाठी पालक 'समन्वयक' शोधतात. काही वेळेस तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागताच मानसोपचारतज्ज्ञांचा आश्रय घ्यावा लागत असतो. तेव्हा त्यांना आपल्याच मुलांना समजून घेण्यासाठी अव्वाच्या सव्वा फिज् पेड करावी लागत असते. याला आपण काय म्हणावे?


'कारट्याने वा कारटीने समाजात आमचे नाक कापले' असे पालक 'नाक' सलामत असतानाही म्हणत असतात. परंतु आपली मुले कोणत्या मानसिकतेतून जात आहेत. याचा विचार करणारे फार कमी संख्येने पालक आहेत. तारूण्यात प्रवेश कणार्‍या मुलांमुलीमध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात. या वयात मुलांना पुरुषत्वाची तर मुलींना स्त्रित्वाची जाणीव होत असते. याच अवस्थेतून पालकही गेलेले असतात. परंतु आपल्या मुलांना ते समजून घेत नाहीत. या वयात पालकांनी मुलांशी मित्रासारखं वागलं पाहिजे. आपल्याविषयी मुलांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. तेव्हा मुले पालकांशी बिनधास्त संवाद साधतात. मनातील विचार कळवितात. मुले आपल्या पालकांपेक्षा आपल्या मित्रांकडे भावना व्यक्त करत असतात. मुलांचा विश्वास संपादन करून 'तु अमुकच व्हावं लागेल' असे म्हणण्या पेक्षा 'तुला काय व्हायचं आहे?' असे विचारून त्याच्या मनातील इच्छा जाणून घ्यावं. त्याच्या करियरच्या बाबतीत पालकांनी कोणताही समझोता करू नये. राहिला त्यांचा प्रेमात पडण्याचा प्रश्न. तर वयात येण्याइतकीच प्रेमात पडणं, ही नैसर्गिक गोष्ट आहे. हे आधी समजून घ्यावं. त्याचं प्रेम किती खोलवर रूजलेलं आहे, हे आधी ओळखले पाहिजे. आपल्या पाल्यांवरील ‍विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. त्यांच्यातील नातं खरोखरीच मित्रत्वाचं आहे का याचाही अंदाज आधी घेतला पाहिजे. परंतु पालक येथेच चुकतात. खरी परिस्थिती जाणून न घेता. मुलांना चारचौघात सुनावत असतात. त्याचे अनिष्ठ परिणाम मुलांच्या मानसिक विचारसरणीवर होतात. त्यामुळे भविष्यात मोठी किंमत मोजाण्याआधीच आपल्या पाल्याशी पालकांनी मित्रत्त्वाचे संबंध जोपासणे गरजेचे आहे.

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...