दिनविशेष :- 03 - जून - शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वे स्मृतिदिन
जन्म - १ एप्रिल १५७८ (फोल्कस्टोन)
स्मृती - ३ जून १६५७ (इंग्लड)
संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here
मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारा इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ. थॉमस हार्वे नामक एका बुद्धिमान माणसाच्या घरी जन्माला आलेल्या विल्यम हार्वेचा आपल्या वडिलांवर खूप विश्वास होता. आरंभी लॅटिनचे शिक्षण घेऊन त्याने विद्यापीठात प्रवेश घेतला आणि पडुआ विद्यापीठात दाखल झाला. साल होतं १५९९. वयाच्या २५व्या वर्षी पडुआ मधून ‘डॉक्टर ऑफ मेडिसीन’ ही पदवी प्राप्त केली. १५९९ मधे पडुआ विद्यापीठात शिक्षण घेण्यास जेव्हा दाखल झाला, तेव्हा त्या विद्यापीठात गॅलिलिओ अध्यापनाचं कार्य करीत होता. हार्वेच्या काळात सुमारे सात वर्षं गॅलिलिओ गणित, भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र शिकवीत होता. सुदैवाने हार्वेला गॅलिलिओ सारखे दु:खाचे दिवस कधीही बघावे लागले नाही. अतिशय प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ आणि शल्यविशारद या विश्वविद्यापीठात कार्य करत होते. यापकी एक होते इटालियन शरीररचनाशास्त्रज्ञ फॅब्रिशिअस. अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या शरीरातील नीलांमध्ये असलेल्या झडपा फॅब्रिशिअसने सर्वप्रथम शोधून काढल्या होत्या, पण या झडपांचं कार्य नेमकं कसं चालतं, हे फॅब्रिशिअसला शोधता आलं नाही. फॅब्रिशिअस हा विल्यम हार्वेचा मार्गदर्शक. फॅब्रिशिअसचं अपूर्ण असलेलं संशोधन हार्वे यांनी पूर्णत्वाला नेलं. रक्तवाहिन्यांमधील झडपांचं काम कसं चालतं, हे हार्वे यांनी शोधून काढलं. इतकंच नव्हे तर शरीरात रक्तप्रवाह खेळता ठेवण्यामध्ये यकृत नव्हे तर हृदयाचं कार्य महत्त्वाचं आहे, हे त्यांनी सांगितलं. १६१६ मध्ये असेच एक व्याख्यान सुरू होते. शवविच्छेदनाच्या टेबलवर, देहान्ताची शिक्षा झालेल्या एका व्यक्तीचे प्रेत पडलेले होते. आजूबाजूला अभ्यासक आणि प्रेक्षक आणि थोडे दूर उभे राहून एक काठीच्या मदतीने हार्वे प्रेताचे भाग दाखवीत होता. रक्तवाहिन्यांकडून त्याची काठी हृदयाकडे वळली. तो म्हणाला, ‘‘सर्व रक्तवाहिका रक्ताला हृदयाच्या उजव्या भागात पोहोचवतात आणि हृदय त्या रक्ताला फुफ्फुसा मध्ये स्वच्छ होण्यासाठी ढकलतं. स्वच्छ रक्त पुन्हा हृदयाच्या डाव्या भागात पोचतं आणि तिथून पुन्हा रक्तवाहिन्या मार्फत पूर्ण शरीरात पोहोचविलं जातं. हृदय एका पंपासारखं काम करतं’’ सर्व श्रोतावर्ग स्तब्ध झाला. कुठून आला हा विचार? हृदय तर आत्म्याचं ठिकाण आहे. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना हृदयातून नव्हे तर यकृतामधून रक्तपुरवठा केला जातो, असा समज दृढ असलेला तो काळ होता.
आपल्या शरीरातलं रक्त यकृतात तयार होतं आणि यकृताच्या नियंत्रणाखाली ते शरीरात पोहोचवलं जातं हा समज शास्त्रीय पद्धतीने खोटा ठरण्यासाठी तब्बल दीड हजार वर्ष जावी लागली. अनेक शतकांपूर्वी ऍरिस्टॉटल आणि गॅलेन सारख्या विद्वानांनी सांगून ठेवलं होतं की, हृदयात ईश्वर आणि ईश्वराचा पवित्र अंशच विराजमान असतो. या माणसाची (हार्वेची) हिंमत कशी झाली त्या हृदयाला रक्ताचा ‘पंप’ म्हणण्याची? सर्वदूर गदारोळ माजला. रक्त माणसाच्या शरीरातून दोन वेगवेगळ्या मार्गामधून फिरत असतं, असंही हार्वे यांचं म्हणणं होतं. त्यातला एक मार्ग आपल्या शरीरातल्या फुप्फुसापासून सुरू होऊन रक्त शरीरभर नेणाऱ्या मार्गाना जोडलेला असतो, तर दुसरा मार्ग आपल्या शरीरामधलं रक्त महत्त्वाच्या अवयवांकडे नेत असतो, असं मत त्यांनी मांडलं. त्यासाठी त्यांनी काही प्रात्यक्षिकंही करून दाखवली. यासंदर्भात त्यांनी गॅलिलिओचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. केवळ गॅलन सांगतो म्हणून एखादी गोष्ट सत्य किंवा प्रमाण न मानता प्रत्यक्ष प्रयोग करून जे समोर येईल ते आपण सत्य म्हणून स्वीकारले पाहिजे, असं हार्वे यांचं म्हणणं असायचं. प्राण्यांच्या छातीचा पिंजरा उघडून हृदयाचं काम कसं चालतं, हे प्रत्यक्ष पाहणारा हा पहिला शास्त्रज्ञ. गेलननं लिहून ठेवलेलं होतं की, माणसाच्या शरीरात १.५ औंस (म्हणजे ०.०४ लिटर्स) इतकं रक्त असतं. तसंच दर वेळी जेव्हा आपलं हृदय एखाद्या पाण्याच्या हापश्यासारखं रक्त उपसतं तेव्हा या रक्तापैकी १/८ रक्त शरीरात शोषून घेतलं जातं. त्यामुळे तेवढं रक्त सतत बदलावं लागतं असं गेलनचं म्हणणं होतं. हार्वेचं म्हणणं होतं की, रक्त हे शरीरात सतत तयार होऊन वापरलं जात नसतं, तर अधूनमधून तयार होत असतं आणि ते तयार झालं की काळजीपूर्वक वापरून पुन:पुन्हा शुद्ध करून वापरलं जातं. हे ठरवताना त्यानं माणसाच्या हृदयातून दर मिनिटाला किती रक्त जात-येत असतं हे मोजलं. ते आधीच्या अंदाजापेक्षा खूप जास्त असल्याचं त्याच्या लक्षात आलं. म्हणजेच जर हृदयाकडून इतर अवयवांकडे जाणारं रक्त ते अयवय शोषून घेत असतील, तर माणसाच्या शरीरात केवढं रक्त तयार करावं लागेल. किंबहुना ते करणं अशक्यच असेल. गेलनच्या सिद्धांतांना हाही एक सुरुंगच होता. पण गॅलनच्या मतांना चुकीचं ठरवल्यामुळे हार्वे यांच्यावर प्रचंड टीका झाली. गेलनच्या मतांना चुकीचं ठरवण्याची ‘चूक’ त्यानं केलेली होती. विशेष म्हणजे हार्वेने रक्ताभिसरणाचा सिद्धांत शोधण्यासाठी अनेक मुडद्यांवर प्रयोग केले होते. हे काम करण्यासाठी हार्वेने अनेक मुडद्यांची चिरफाड केली. त्या काळात सारख्या लढाया होत नि पुष्कळ माणसं मरत असत, पण चिरफाडीसाठी मुडदे मिळणं अवघडच होतं. मृत सैनिकांचे नातेवाईकच नव्हे, तर सैन्याधिकारीसुद्धा हार्वेला संशोधनासाठी मृतदेह पुरवायला नाखूष असत. यामुळे वैतागलेल्या हार्वेने स्वतःची बहीण आणि स्वतःचे वडील मरण पावल्यावर प्रथम त्यांच्या मृतदेहाचे विच्छेदन केलं. आवश्यक ती शास्त्रीय निरीक्षणं केली आणि मगच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
No comments:
Post a Comment