Monday 15 May 2023

दिनविशेष 15 मे - भारतीय वृक्ष दिन | Special Day 15 May - Indian Tree Day

दिनविशेष - 15 मे - भारतीय वृक्ष दिन

आज जागतिक तापमानात कमालीची वाढ होत आहे. ही परिस्थिती उद्भवण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे, बेसुमार वृक्षतोड. विकासाच्या नावाखाली विविध प्रकल्प राबविण्यासाठी जगभरात मोठ्या संख्येने वृक्षांची कत्तल होत आहे. परिणामी, दुष्काळ, अवकाळी पाऊस, प्रदूषणासारख्या संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. अशाच एका रस्ते प्रकल्पाला हैद्राबाद येथील स्थानिकांनी सरकारचा विरोध करत वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेतल्याची घटना २ वर्षांपूर्वी घडली. हैद्राबाद शहरातील कासू ब्रह्मानंद रेड्डी नॅशनल पार्क (केबीआर) परिसरातील हजारो वृक्षतोडीचा सरकारच्या मनसुब्याचा स्थानिकांनी निषेध केला. तेलंगणा सरकारने प्रस्तावित केलेल्या स्ट्रॅटेजिक रोड डेव्हलपमेंट प्लाननुसार केबीआर पार्कचा इको-सेन्सेटीव्ह क्षेत्रासह जवळपास संपूर्ण परिसराला या प्रकल्पामुळे धोका निर्माण झाला होता. यामुळे उद्यानातील जवळपास ६०० पेक्षा अधिक वनस्पती, प्राणी पक्ष्यांच्या शेकडो प्रजातींचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली होती. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी एप्रिल २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात हैद्राबाद रायझिंग या समूहाने एका छोट्याशा निषेध रॅलीचे आयोजन केले होते. 


या समूहात निष्पक्षपाती, अराजकीय लोकांचा समावेश होता. कालांतराने हैद्राबाद शहरातील स्थानिकांनी वृक्ष संवर्धनाच्या उद्देशाने हैद्राबाद रायझिंग समूहाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास सुरुवात केली. मातृदिन, पितृदिन, शिक्षक दिनाप्रमाणेच वृक्ष दिन असावा, अशी कल्पना रायझिंग हैद्राबाद समूहातील सदस्यांना सुचली. त्याप्रमाणे १५ मे २०१६ रोजी हैद्राबाद रायझिंग समूहातर्फे वन दिनाचे आयोजन करण्यात आले. या दिनी वृक्षांना आलिंगण देत, त्यांना पाणी देत, वृक्षांवर पवित्र धाग्यांचे बंधन बांधत सेल्फी घेण्याचा हटके उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात धावपटू, योगा प्रेमी, वृक्ष प्रेमी, निसर्ग प्रेमी, पर्यावरण संरक्षणवादी, शहर नियोजक आणि वाहतूक सल्लागारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 


कार्यक्रमात सहभागी सर्वांनी सरकारच्या वृक्षतोडीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जेव्हा पीटर जे पार्क सारख्या योजनाकारांनी रस्ते रुंदीकरण आणि फ्लायओव्हर्स उभारल्याने वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही, असे सांगितले तरीही प्रस्तावित प्रकल्पासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड का? असा प्रश्न हैद्राबाद रायझिंग समूहातील सदस्यांनी सरकारला विचारला. तसेच सरकारने शाश्वत विकासाचे धोरण अवलंबवावे अशी विनंतीही सदस्यांनी सरकारला यावेळी केली. पर्यावरणाचे प्राध्यापक पुरुषोत्तम रेड्डी यांनीही हैद्राबादकरांच्या या कृतीचे कौतुक केले. तसेच यापुढील काळात १५ मे रोजी भारतातील विविध भागात वृक्ष दिन साजरा होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 


चला तर मग हैद्राबादकरांच्या या स्तुत्य उपक्रमात आपणही सहभागी होऊया. आजच्या दिनी प्रत्येक कुटुंबाने एक तरी वृक्ष लावूया. वृक्ष दिन साजरा करून, पर्यावरण दिन साजरा करूया. तसं महाराष्ट्र सरकारने वृक्ष लागवडीचा प्रचंड मोठा कार्यक्रम गेल्या तीन वर्षांपासून हाती घेतला आहे. कोट्यवधी वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेत लागवडही मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. शासकीय स्तरावरील या मोहिमेला प्रचंड उत्साह असतो. लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे पुढे काय होते, याकडे मात्र सरकरचे आणि सरकारी संस्थांचे लक्ष राहत नाही. त्याकडे अधिक जागरुकतेने लक्ष दिले तर वृक्ष दिनाचं सार्थक झाल्यासारखं होईल.

No comments:

Post a Comment

22 January 2024 आजच्या शैक्षणिक बातम्या Today's Educational News शाळा, विद्यार्थी, शिक्षक व शैक्षणिक घडामोडींशी संबंधित दररोजच्या बातम्या.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संबंधित आजच्या शैक्षणिक बातम्या Today's Educational News शाळा, विद्यार्थी, शिक्षक व शैक्षणिक घडामोडींशी संबं...