Tuesday, 27 October 2026

दिनविशेष 26 ऑक्टोबर | Din Vishesh 26 October

[27/10, 05:48] Shaley Shikshan: *@ २६ ऑक्टोबर @*

*हूव्हर धरण चे पहीले जनित्र सुरू*


हूव्हर धरण चे पहीले जनित्र २६ ऑक्टोबर १९३६ रोजी सुरू झाले. हे धरण अमेरिकेच्या नेव्हाडा व अ‍ॅरिझोना राज्यांच्या सीमेवरून वाहणार्‍या कॉलोराडो नदीवरील एक आहे. १९३६ साली बांधून पूर्ण केलेले हे धरण ३७९ मी लांब व २२१.४ मी उंच आहे. नैऋत्य अमेरिकेतील दुष्काळी व वाळवंटी भागांत पाणी तसेच जलविद्युत निर्मितीसाठी हे धरण बांधले गेले. या धरणामधून २०८० मेगावॉट विजनिर्मिती व ११००० घनमीटर प्रतिसेकंद जलप्रवाह होऊ शकतो. लास व्हेगास शहराच्या ४० किमी आग्नेयेला असलेले हूव्हर धरण या भागातील एक लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे. वीज निर्मिती करणाऱ्या यंत्राला जनित्र असे म्हणतात. यात अनेक प्रकार असतात. पाण्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या यंत्राला जल विद्युत जनित्र. असे जनित्र वैतरणा येथील जल विद्युत प्रकल्पात आहे. असे तर कोळश्याच्या उष्णते पासून वीज निर्मिती करणाऱ्या यंत्राला औष्णिक जनित्र असे म्हणतात. असे जनित्र एकलहरा, चंद्रपूर येथील औष्णिक वीज प्रकल्पा मध्ये आहे. इतिहास- विद्युत जनित्राचा शोध मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने लावला.


*संदर्भ : विज्ञान दिनविशेष*

[27/10, 05:48] Shaley Shikshan: *❀ २६ ऑक्टोबर ❀*

*अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे जन्मदिन*


जन्म - २६ ऑक्टोबर १९५४ (मुंबई)

स्मृती - १६ डिसेंबर २००४ (मुंबई)


लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. कसदार अभिनय करणाऱ्या या अभिनेत्याकडे त्यांच्या अभिनय क्षमतेला वाव मिळू शकतील असे चित्रपट अपवादानेच मिळाले. वास्तविक अनेक गंभीर भूमिका मधूनही त्यांनी आपली सशक्त अभिनय क्षमता दाखवून दिली. मात्र, एकूणच त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे त्यांच्यावरचा विनोदी अभिनेत्याचाच शिक्का कायम राहिला. लक्ष्मीकांत यांना खरा 'ब्रेक थ्रू' मिळाला तो 'टुरटुर' या नाटकाने. हे पहिलेच नाटक जबरदस्त हीट ठरले. त्यानंतर शांतेचे कार्ट चालू आहे, बिघडले स्वर्गाचे द्वार, कार्टी चालू आहे ही नाटकेही यशस्वी ठरली. मग लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मागे वळून पाहिलेच नाही. नाटके करता करता त्यांनी चित्रपटात प्रवेश केला. तेथेही ते प्रचंड यशस्वी ठरले. 'लक्ष्या' या नावाने अबालवृद्धा मध्ये त्याची लोकप्रिय पसरली. त्यांची जोडी जमली ती महेश कोठारे यांच्या समवेत. कोठारेंचा चित्रपट अन लक्ष्मीकांत बेर्डे नाही असे सहसा घडलेच नाही. कारण कोठारे व बेर्डे म्हणजे व्यावसायिक यशाची हमखास खात्री अशी ओळख निर्माण झाली होती. त्याच बरोबर या दोघांचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के हमी हे समीकरणही रूढ झाले होते. धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट ते आताच्या 'झपाटलेला' पर्यंत ते कायम होते. सचिन बरोबरही 'बनवाबनवी' सह अनेक चित्रपट केले. त्यांना अभिनयाची नैसर्गिक देणगी मिळाली होती. विनोदाचे त्यांचे टायमिंग अचुक होते. प्रेक्षकांच्या समोर आल्या नंतर त्यांना ताब्यात घेऊन टाकण्याची त्यांची शैली अनोखी होती. त्यांच्या लोकप्रियतेला 'कॅश' करण्यासाठी 'चल रे लक्ष्या मुंबईला' सारखा चित्रपटही निघाला. शिवाय अनेक चित्रपट त्यांना समोर ठेवून काढण्यात आले. त्यात अनेक पडेल चित्रपटही होते. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने याच काळात धुमाकूळ घातला. वास्तविक या दोन्ही कलाकारांचे ट्युनिंग अतिशय चांगले जमले होते. मात्र, त्याचा चांगला उपयोग फार कमी दिग्दर्शकांना करता आला. त्यांच्या चित्रपटांनी मराठी मनांचे मनोरंजन करीत अनेकांना आयूष्यातील तणाव, दुःख विसरायला लावून आनंदाचे कारंजे फूलविले. मराठीत प्रसिध्दीच्या लाटेवर स्वार असतांनाच त्यांना हिंदी‍त चांगल्या निर्मिती संस्थांच्या ऑफर्स आल्या. राजश्री प्रॉडक्शनचा 'मैने प्यार किया' हा त्यातीलच एक. यात लक्ष्मीकांतने सलमान खानच्या मित्राची भूमिका अगदी छान निभावली. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. पण अभिनयाचा कस लागेल अशी भूमिका त्यांना हिंदीत क्वचितच मिळाली. मराठीत अशा भूमिका त्यांना मिळाल्या, पण त्याही अगदी थोड्याच. अनेक दूरचित्रवाणी मालिका मधूनही त्यांनी एक काळ गाजवला. पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या 'एक होता विदुषक' या चित्रपटातील भूमिकेने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. पण तशा भूमिका त्यांना फार काही मिळाल्या नाहीत. शेवटच्या काळात त्यांनी पुन्हा रंगभूमीवर 'लेले विरूद्ध लेले' आणि 'सर आले धावून' या नाटकाद्वारे बऱ्याच वर्षांनी पाऊल ठेवले. पण ही नाटके फार चालली नाहीत. असा हा हरहुन्नरी कलाकार चाहत्यांना शेवट पर्यंत हसवत राहिला. 


*संजीव वेलणकर, पुणे*

*९३२२४०१७३३*

*संदर्भ : इंटरनेट*

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

[27/10, 05:48] Shaley Shikshan: *✹ २६ ऑक्टोबर ✹*

*संशोधक व्लादीमीर हाफकीन स्मृतिदिन*


जन्म - १५ मार्च १८६० (बेर्डीन्स्क)

स्मृती - २६ ऑक्टोबर १९३० (स्वित्झर्लंड)


डॉ. व्लादीमीर मॉर्डेकाई वूल्फ हाफकीन हे एक रशियन सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ होते. हाफकीन हे यहूदी धर्मीय होते. पॅरिसमधील लुई पाश्चर संस्थेत काम करत असताना त्यांनी कॉलरा विरोधी लस विकसित करून तिचे भारतात यशस्वीरीत्या परीक्षण केले. ते पटकी आणि ब्युबॉनिक प्लेग (गाठीचा प्लेग) वरची लस बनवणारे आणि त्यांची तपासणी करणारे पहिले सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. मुंबईत परळ येथील सूक्षजीवशास्त्रात संशोधन करणाऱ्या आणि विविध लसींचे उत्पादन करणाऱ्या संस्थेला हाफकीन इन्स्टिट्यूट असे नाव दिले आहे. डॉ. वाल्देमार हाफकीन हे लुई पाश्चरचे विद्यार्थी होते. ते मार्च १८९३ मध्ये हिंदुस्थानात आले आणि कलकत्त्यातील कॉलऱ्याच्या साथीविरुद्ध त्यांनी जणू एकाकी युद्ध पुकारले. पॅरीसमध्ये असताना त्यांनी विकसित केलेली कॉलऱ्याची लस ते लोकांना टोचू लागले. या लसीचे चांगले परिणाम दिसू लागल्यावर, मुंबईच्या गव्हर्नरने त्यांना मुंबईत आणि पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी बोलावले. १८९६ मध्ये मुंबईत आल्यावर तेथील गव्हर्नरने हाफकीन यांना जेजे इस्पितळाच्या परिसरात एक प्रयोगशाळा उभारून दिली. हाफकीनने प्लेगच्या लसीचा शोध लावण्याचे आव्हान स्वीकारले आणि काही महिन्यात जशी हवी तशी प्राथमिक लस बनवली. या लशीचा पहिला प्रयोग हाफकीनने १० जानेवारी १८९७ रोजी स्वतःवरच केला. लशीमुळे कुठलाही अपाय न झाल्याने ही लस सुरक्षित आहे असे समजून लोकांना टोचण्यास सुरुवात केली. आणि खरोखरच पुण्या-मुंबईतल्या प्लेगची साथ आटोक्यात आली. या लसीमध्ये कालांतराने सुधारणा होत राहिल्या. पुढे १० ऑगस्ट १८९९ रोजी गव्हर्नर लॉर्ड सँडहर्स्ट यांनी मुंबईच्या गव्हर्नरांचा एकेकाळचा राहण्याचा परळ येथे असलेला महाल डॉ. वाल्डेमार मॉर्डेकाई हाफकीन यांच्या स्वाधीन केला. तेथे डॉ. हाफकीनने ’प्लेग रिसर्च लॅबॉरेटरी’ स्थापन केली व स्वतः हाफकीन त्या संस्थेचे प्रमुख संचालक झाले. त्यांनी १९०४ मध्ये हिंदुस्थान सोडल्यानंतर, १९०६ मध्ये त्या संस्थेचे नाव बाँबे बॅक्टेरिऑलॉजी लॅबॉरेटरी झाले आणि १९२५ मध्ये हाफकीन इन्स्टिट्यूट झाले.


*संदर्भ : दिनविशेष आणि विज्ञान*

[27/10, 05:48] Shaley Shikshan: *✹ २६ ऑक्टोबर ✹*

*कवी डॉ. दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे स्मृतिदिन*


जन्म - ३१ जानेवारी १८९६ (धारवाड,कर्नाटक)

स्मृती - २६ ऑक्टोबर १९८१ (मुंबई)


कन्नड भाषेतील कवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे हे 'अंबिकातनयदत्त' या टोपणनावाने लिहीत. त्यांची मातृभाषा मराठी, परंतु मराठी, कन्नड, इंग्रजी आणि संस्कृत मधून त्यांनी काव्यलेखन केले आहे. ‘अंबिकातनयदत्त’ या नावानेही ते कर्नाटकात प्रसिद्ध आहेत. बेंद्रे यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्य़ातील केळशी या गावचे. घरी विलक्षण दारिद्रय़. त्यामुळे त्यांचे पूर्वज धारवाड येथे वास्तव्यास आले. वडील गंडमाळेने आजारी पण आईचे संस्कार, प्रेम आणि वेदसंपन्न आजोबांचे संस्कार हीच वारसा हक्काने त्यांना मिळालेली संपत्ती. मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण धारवाड येथे झाल्यावर पुण्यातील फग्र्युसन कॉलेजमधून ते बीए झाले. पुढे मुंबई विद्यापीठातून ते १९३५ मध्ये एमए झाले. १९४४ ते ५६ मध्ये ते सोलापूरच्या दयानंद कॉलेज मध्ये कन्नडचे प्राध्यापक होते. १९५६ ते ६६ पर्यंत आकाशवाणी धारवाड केंद्रावर साहित्य सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. सुरुवातीला राष्ट्रीय चळवळीत त्यांचा सहभाग होता. ‘नरबली’ या त्यांच्या कविता लेखनामुळे १९३२ मध्ये त्यांना तुरुंगवास व अज्ञातवास भोगावा लागला. १९४३ पर्यंत त्यांच्या जीवनात स्थिरता नव्हती. ‘बालकाण्ड’ या कवितेने बेंद्रे यांनी, आपल्या बालपणच्या आठवणी व्यक्त केल्या आहेत. १९३२ मध्ये ‘कृष्णाकुमारी’ हा बेंद्रे यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. बेंद्रे यांच्या काव्याला अनेक समीक्षक ‘बौद्धिक काव्य’ म्हणतात. त्यांच्या कितीतरी कविता बौद्धिक असल्या तरी त्यांच्या इतर कवितांचे विषय आध्यात्मिक आणि रहस्यवादीच असत. निसर्ग, प्रेम, देशभक्ती, सामाजिक जाणीव व आध्यात्मिक चिंतन ही त्यांची आवडती विषयसूत्रे होती. त्यांच्या नवोदय युगातील कन्नड काव्यातले  योगदानासाठी १९६८ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला होता. २६ काव्यसंग्रह, दोन नाटके, कथासंग्रह, नऊ समीक्षाग्रंथ, सहा अनुवादित पुस्तके, एवढे विपुल लेखन त्यांनी कन्नड मध्ये केले होते. कन्नड कविता व नाटकांशिवाय त्यानी मराठी साहित्य कृतींचे कन्नड भाषेत अनुवादही केले. १९७३ चा ज्ञानपीठ पुरस्कार दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांना त्यांच्या ‘नाकुतन्ती’ या काव्यसंग्रहासाठी दिला होता. हा काव्यसंग्रह १९६२ ते १९६६ या कालखंडातील प्रकाशित भारतीय भाषेतील सृजनात्मक साहित्यात सर्वश्रेष्ठ म्हणून घोषित करण्यात आला. 


*संजीव वेलणकर, पुणे*

*९४२२३०१७३३*

*संदर्भ : इंटरनेट*

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

[27/10, 05:48] Shaley Shikshan: *🌹 २६ ऑक्टोबर 🌹*

*अभिनेत्री रवीना टंडन # वाढदिवस*


जन्म - २६ ऑक्टोबर १९७६ (मुंबई)


रवीना ही फिल्ममेकर रवी टंडन यांची कन्या. तिने आपल्या करिअरची सुरुवात सलमान खान सोबत 'पत्थर के फुल' या सिनेमातून केली. मात्र तिला मोठे यश १९९४ मध्ये रिलीज झालेल्या 'मोहरा' या सिनेमातून मिळाले. या सिनेमातील 'तू चीज बडी है मस्त मस्त' हे गाणे खूप गाजले होते.  ह्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला. तेव्हा पासून तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या. परंपरा, अंदाज अपना अपना, बडे मियां छोटे मियां इत्यादी तिचे काही चित्रपट आहेत. १९९० च्या दशकामध्ये रविना बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्री असली तरीही तिच्या अभिनयासाठी ती विशेष ओळखली जात नसे. परंतु २००१ सालच्या 'दमन' ह्या चित्रपटासाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तसेच मधुर भांडारकरच्या २००३ मधील 'सत्ता' या चित्रपटा मधील अभिनयाचे समीक्षकांनी कौतुक केले. रवीनाचे चित्रपट वितरक अनिल थडानी सोबत लग्न झाले असून तिला दोन मुले आहेत. राशा हे तिच्या मुलीचे तर रणबीरवर्धन हे मुलाचे नाव आहे. लग्नानंतर रवीनाने बॉलिवूडमध्ये काम कमी केले आणि ज्वेलरी डिझायनिंगच्या बिझनेसकडे वळली. रवीना टंडनचा ‘मातृ’ हा सिनेमा अलीकडेच रिलीज झाला.


*संजीव वेलणकर, पुणे*

*९४२२३०१७३३*

*संदर्भ : इंटरनेट*

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

No comments:

Post a Comment

दिनविशेष 26 ऑक्टोबर | Din Vishesh 26 October

[27/10, 05:48] Shaley Shikshan: *@ २६ ऑक्टोबर @* *हूव्हर धरण चे पहीले जनित्र सुरू* हूव्हर धरण चे पहीले जनित्र २६ ऑक्टोबर १९३६ रोजी सुरू झाले...