दिनविशेष :- 13 जून - शास्त्रज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल जन्मदिन
जन्म - १३ जून १८३१ (इडिनबुर्ग)
स्मृती - ५ नोव्हेंबर १८७९ (केम्ब्रिज)
संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here
क्लासिकल फिजिक्सची धुरा सांभाळणारा न्यूटन नंतरचा अत्यंत बुद्धीमान शास्त्रज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल. १९व्या शतकाच्या मध्यावर मॅक्सवेलनं वीज, चुंबकत्व आणि त्यांच्यातील संबंध दाखवणारी समीकरणे लिहिली आणि भौतिकशास्त्रात क्रांती झाली. लहानपणापासूनच मॅक्सवेल स्वतःच अनेक थियरीज काढायचा. त्यामधे त्याची 'झोपेची थियरी' सुध्दा होती. त्यानुसार तो स्वतः संध्याकाळी ५ ते ९:३० पर्यंत झोपायचा, त्यानंतर पहाटे २ वाजेपर्यंत वाचायचा. रात्रीच २ ते २:३० अशा वेळेत त्याच्या घराचा जिना वरखाली चढून व्यायाम करायचा. मग पुनः २:३० ते सकाळी ७ वाजेपर्यंत हे महाशय झोपायचे. शेजार्यांना मॅक्सवेलचा रात्रीचा पराक्रम माहितही नसायचा. पण काही वेळा त्याच्या व्यायामाच्या थियरीमुळे होणार्या आवाजाने लोक वैतागायला लागले. व्यायाम करत असताना बाजूच्या घरातून जेव्हा बूट,चपला पडू लागल्या तेव्हा मॅक्सवेलने त्याची ही थियरी मागे घेतली. १८५६ साली स्कॉटलंड मधल्या अबेदिनच्या मॅरिस्कल कॉलेजातल्या तत्वज्ञानाशी संबंधित असलेल्या मानाच्या संघटनेचं सदस्यत्व मिळालं. तिथे १८५९ साली त्यानं शनी ग्रहाच्या भोवती असलेल्या गोल वर्तुळांविषयी फारशी माहिती उपलब्ध नसताना एक प्रबंध लिहिला. त्याच्यानंतर १०० वर्षांनी मॅक्सवेलचं या बाबतीतलं म्हणणं खरं ठरल होतं. १८६० साली मॅक्सवेल देवीच्या रोगाच्या हल्ल्यातून दगावता दगावता कसाबसा बचावला. मॅक्सवेलची विद्युतचुंबकीय क्षेत्रावरील समीकरणे म्हणजे त्याच्या बुद्धीमत्तेचा कळस होता. त्यावरून त्याने मांडले की विद्युतचुंबकीय लहरींचा वेग हा कायम एकच असतो. जेव्हा गणिताने त्याने तो मोजला तेव्हा त्याला तो प्रकाशाच्या वेगाइतका आढळला. त्यामुळे मॅक्सवेलला या विद्युतचुंबकीय लहरी आणि प्रकाश यांचा काहितरी संबंध आहे असे वाटू लागले होते. यावरून त्यानं एक अत्यंत महत्वाचा निष्कर्ष काढला तो म्हणजे,"या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी म्हणजेच प्रकाश आहे. फ़क्त प्रकाश स्वरूपातील लहरींचा आपल्या डोळ्यावरील रेटीनावर परीणाम झाल्याने त्यांची आपल्याला जाणीव होते इतकेच. पण इतर फ़्रेक्वेन्सीजच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा डोळ्यांवर परिणाम होत नाही म्हणून त्या आपल्याला दिसू शकत नाहीत पण त्या लहरी अस्तित्वात असतात" हाच त्याचा महत्वाचा सिद्धांत. प्रत्यक्षात मॅक्सवेलनं कधीच इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी शोधायचा किंवा तयार करायचा प्रयत्न केला नाही किंवा याविषयी तो कुणाजवळ बोलला असावा असंही वाटत नाही. मॅक्सवेलनं यासाठी विविध समीकरणं मांडली. त्यांना मॅक्सवेलची समीकरणे म्हणतात. मॅक्सवेलची इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींशी संबंधित मूळची वीस समीकरणं होती. त्यांचं नंतर सुलभीकरण करून ऑलिव्हर हेवीसाईडनं (१८५०-१९२५) फक्त चार समीकरणा मध्ये रुपांतर केलं. ही समीकरणे इतकी लोकप्रिय झाली की लोक ती समीकरणे टी शर्टवर घालून मिरवायला लागले. ती समीकरणे त्यांना समजत नव्हती हा भाग वेगळा पण त्या समीकरणांनी लोकांवर एक वेगळीच जादू त्याकाळी केली होती. मॅक्सवेल श्रीमंत होता. कॉलेज मधे असताना तो एका तरूणीच्या प्रेमात पडला होता, पण ती त्याची कझीन असल्याने त्याकाळच्या 'घराण्यातच लग्न केलं तर होणारी मुलं विचित्र असु शकतात' अशा समजुतीनं मॅक्सवेलचा 'प्रेमाचा प्रयोग' मात्र फ़सला होता. त्यानंतर १८५८ मधे त्याचं कॅथरीन नावाच्या मुलीशी लग्न झालं. मॅक्सवेल प्रोफेसर सुद्धा होता पण तो त्याच्या विद्यार्थ्यांना कधीच चांगला शिक्षक वाटला नाही. त्याचे वर्गातील प्रयोग अनेकदा चुकत. शिकवताना सुद्धा त्याची बुद्धी त्याच्या हातापेक्षा जास्त वेगाने चालत असल्याने जे फ़ळ्यावर लिहायचा त्यापेक्षा त्याचे डोके बरेच पुढे गेलेले असल्याने अचानक कधीतरी काहितरी पुटपुटायचा आणि अचानक काहितरी वेगळेच समीकरण मांडायचा, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याने शिकवलेले काही कळायचे नाही. मॅक्सवेलने विस्तृत तरंगलांबीच्या विद्युत्चुंबकीय लहरींचे अस्तित्त्व गणिताने सिद्ध केलें होते. परंतु त्यानें गणितानें मांडलेली उपपत्ती प्रयोगानें सिद्ध व्हायच्या अगोदरच सन १८७९ मध्ये तो मरण पावला. तो अगदी लहान असताना त्याची आई वयाच्या ४८व्या वर्षी पोटाच्या कॅन्सरने भुलेविना झालेल्या अयशस्वी शस्त्रक्रियेमुळे दगावली. त्याच्या आईला होणार्या वेदना मॅक्सवेलने पाहिल्या होत्या, त्यामुळे जेव्हा त्याची आई वारली तेव्हा तो म्हणाला, "हे आता बरं झालं, निदान तिला यापुढे वेदना तरी होणार नाहीत." पण योगायोग म्हणजे मॅक्सवेल सुद्धा त्याच्या आई प्रमाणेच पोटाच्याच कॅन्सरने १८७९ साली मरण पावला आणि त्याचेही वय त्याच्या आई इतकेच ४८ वर्षांचेच होते.
No comments:
Post a Comment