Tuesday, 6 May 2025

दिनविशेष :- 10 जून - कामगारांना रविवारची सुट्टी लागू

दिनविशेष :- 10 जून - कामगारांना रविवारची सुट्टी लागू



संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here



१० जून १८९० या दिवसापासून कामगारांना रविवारची सुटी मिळू लागली. रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस असं आपण गृहीत धरतो. अर्थात याला काही अपवाद आहेत, पण सर्वसाधारणपणे रविवारच्या दिवशी कामं बंद ठेवली जातात. आजचा १० जून हा एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण आजच्याच दिवशी इतिहासात कामगारांना रविवारची सुट्टी मंजूर करण्यात आली होती. जी सुट्टी आपल्याला आज सहज मिळते, तीच मिळवण्यासाठी त्याकाळी मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. त्याचीच ही गोष्ट. ही १८९० ची गोष्ट आहे. तेव्हा भारतात ब्रिटीश राजवट होती. १८७५ पासून भारतात मोठ्या प्रमाणात गिरण्या चालू झाल्या होत्या. सुरुवातीला गिरण्यांची संख्या ५४ होती, नंतर ती वाढत गेली. यात मुंबईचा देखील समावेश होता. जितक्या मोठ्या प्रमाणात गिरण्या निर्माण झाल्या, तितक्याच मोठ्या प्रमाणात कामगारांची संख्या वाढली. या गिरण्या कामगारांकडून अमानुषपणे काम करून घेत. कामगारांना ९ ते १० तास काम करावं लागे. मात्र या कामाच्या तासांमध्ये जेवणाची सुट्टी देखील नसायची. सलग सकाळी ५ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत काम करावं लागे. मुंबईतील कामगारांमध्ये स्त्रिया आणि बालमजूर सुद्धा होते. स्त्रियांची संख्या २५,६८८ होती तर बालमजुरांची संख्या ६,४२४ होती. हातावर पोट असल्याने त्यांना कोणत्याही परिस्थतीत वेळेवर कामावर पोहोचण्या शिवाय पर्याय नसायचा. आजारी असणं म्हणजे उपासमार हे ठरलेलं गणितच होतं. शिवाय उशिरा आल्यावर पगार कापला जायचा. अशा अमानुष काम करून घेण्याच्या पद्धतीला आळा घालण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी पुढाकार घेतला. त्यांना हिंदुस्थानी कामगार चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखलं जातं. त्यांनी कामगारांची सभा घेऊन आपल्या प्रमुख्य मागण्या तयार केल्या. 

या मागण्या पुढील प्रमाणे होत्या. सुरुवातीच्या दोन मागण्या महत्वाच्या समजल्या जातात.

*१)* कामाचे तास कमी करणे

*२)* आठवड्यातून एक सुट्टी

*३)* जेवणासाठी अर्ध्या तासाची सुट्टी

*४)* पगार वेळेवर व्हावा

*५)* कामगाराच्या मृत्यु नंतर त्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळावे. अपघात झाल्यास नुकसान भरपाई आणि रजेचा पगार मिळावा.

या मागण्या त्यांनी सरकारकडे पाठवल्या. सरकारने त्याकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला. याला उत्तर म्हणून २४ एप्रिल रोजी हजारो कामगार रस्त्यावर उतरले. मोठा मोर्चा निघाला. शेवटी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांना यश आलं. १० जून १८९० पासून कामगारांना रविवार ची सुट्टी मंजूर झाली. त्याबरोबर इतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. भारतीय इतिहासातला कामगारांचा हा सर्वात मोठा विजय म्हणून ओळखला जातो. हे सर्व घडून येण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा होता, त्या नारायण मेघाजी लोखंडे यांनी पुढे ‘बाँबे मिल हँड्‌स असोसिएशन’ ही भारतातील पहिली गिरणी कामगार संघटना स्थापन केली. या संघटने मार्फत कामगारांसाठी ते आयुष्यभर लढत राहिले.

No comments:

Post a Comment

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...